• Wed. Sep 9th, 2026

Crime News: एण्ट्रीवरून वाद, १५ युरोपीय देशांत शेफ म्हणून काम केलेल्या मास्टर शेफने कॅफेला लावली थेट आग

नागपूर : कॅफेत प्रवेश करताना गुटखा आत नेण्यास मनाई केल्याने झालेला वाद, त्यानंतर सर्व्हिसवरून निर्माण झालेली नाराजी आणि ‘इगो हर्ट’ झाल्याने एका मास्टर शेफने चक्क कॅफेलाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातील शिवाजीनगर परिसरात समोर आला आहे. ‘द बॅरेल कॅफे’मध्ये पेट्रोल टाकून आग लावल्याने सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या घटनेचा उलगडा करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबरच्या रात्री मनमोहन उर्फ निखिल बुद्धसागर तिवारी (३१) हा द बॅरेल कॅफेमध्ये गेला होता. कॅफेत प्रवेश करताना त्याच्याकडे गुटखा होता. मात्र, कॅफेच्या नियमांनुसार गुटखा आत नेण्यास त्याला परवानगी देण्यात आली नाही. यावरून मनमोहन आणि कॅफेतील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गुटखा बाहेर ठेवण्यास सांगितल्याने तो नाराज झाला. त्यानंतर एण्ट्रीसाठी त्याच्याकडून काही रक्कम जमा करून घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे आधीच नाराज असलेल्या मनमोहनचा राग त्यानंतर आणखी वाढला. त्याने कॅफेमध्ये दारू खरेदी केली होती. मात्र, ती दारू बनावट असल्याचा त्याचा आरोप होता. पैसे देऊनही अपेक्षित सर्व्हिस मिळाली नाही, असा त्याचा आरोप होता. गुटखा आत नेण्यास दिलेला नकार, एण्ट्रीच्या वेळी झालेला वाद आणि त्यानंतर सर्व्हिसबाबत झालेली नाराजी यामुळे त्याचा ‘इगो हर्ट’ झाला. याच रागातून त्याने कॅफेला धडा शिकवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कॅफेतून बाहेर पडल्यानंतर मनमोहनने त्याचा साथीदार शुभम श्रीकृष्णकुमार विश्वकर्मा (२२) याला फोन केला. त्यानंतर शुभम ज्या हॉटेलमध्ये काम करीत होता, तेथून त्याला सोबत घेऊन दोघे पुन्हा द बॅरेल कॅफेजवळ पोहोचले. दोघेही तेथे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मनमोहनने आपल्या गाडीतून पेट्रोल काढले. कॅफेजवळ पोहोचल्यानंतर कथितरित्या पेट्रोलचा वापर करून त्याने कॅफेमध्ये आग लावली. आग लावल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

आगीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेताना पोलिसांनी कॅफेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये संशयित व्यक्ती कॅफेमध्ये प्रवेश करताना तसेच काही वेळाने आग लावल्यानंतर बाहेर पडताना दिसून आली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मनमोहन आणि शुभम यांची ओळख पटवली आणि दोघांना ताब्यात घेतले.

मुख्य आरोपी मनमोहन उर्फ निखिल तिवारी हा पेशाने मास्टर शेफ आहे. त्याने यापूर्वी युरोपातील सुमारे १० ते १५ देशांमधील मोठ्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सध्या तो नागपूरच्या खामला परिसरात स्वतःचे हॉटेल चालवत असल्याचे सांगितले जाते. तर दुसरा आरोपी शुभम विश्वकर्मा हा मूळचा भोपालचा असून नागपुरातील हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तो नंदनवनमधील शास्त्रीनगर येथील हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती आहे. गुटखा आत नेण्यास दिलेल्या साध्या नकारातून सुरू झालेला वाद थेट कॅफे पेटवण्यापर्यंत पोहोचल्याने या घटनेची शहरात चर्चा असून अंबाझरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed