आई-बहिणीवरून शिवी दिली तर आता थेट ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. अहिल्यानगरच्या कोळगाव ग्रामसभेने महिला दिनानिमित्त हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला असून, कचरा टाकणाऱ्यांवरही दंडाची टांगती तलवार असणार आहे.
महिलांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या शिवीगाळीला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथे महिला दिनाच्या निमित्ताने एक धाडसी आणि आदर्श निर्णय घेण्यात आला आहे. गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास संबंधित व्यक्तीकडून थेट ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव महिला ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे कोळगावात सध्या या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल
जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी कोळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अंगणवाडी सेविका शकुंतला देशमुख होत्या. अध्यक्षपदाची सूचना अंगणवाडी सेविका विद्या लगड यांनी मांडली तर त्यास मीना भापकर यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे यांनी विषयपत्रिका वाचून दाखवली. ग्रामसभेत प्रथम शेती व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
Jalgaon News : दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवले, पण 16 वर्षीय मुलीला वाचवताना नदीमचा बुडून मृत्यू; मुलगीही दगावली, जळगाव हळहळलं
त्यानंतर महिलांनी गावातील सामाजिक वातावरणावर चर्चा करत महिलांवरून होणाऱ्या शिवीगाळीच्या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून आई-बहिणींवरून शिवी देणाऱ्याचा व्हिडिओ पुरावा ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास त्या व्यक्तीकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल, असा ठराव करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी घेतलेला हा निर्णय ग्रामस्थांनीही उचलून धरला आहे.
स्वच्छतेसाठी १०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार
याच बैठकीत गाव स्वच्छ ठेवण्यासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. घर, दुकान किंवा परिसरात कचरा टाकल्याचा फोटो ग्रामपंचायतीकडे सादर झाल्यास संबंधित व्यक्तीकडून १०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपक्रम राबविण्याचा निर्धारही ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला. या ग्रामसभेस सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच विलास शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Beed Crime : एका महिन्यात 3 वेळा विक्री, 3 वेळा लग्न… बीडच्या तरुणीचा अमानुष छळ; चौथ्या लग्नाआधी विष पिऊन जीवन संपवायचा प्रयत्न
महिलांच्या सन्मानासाठी नवा आदर्श
यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या सन्मानासाठी अशा निर्णयांची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात शकुंतला देशमुख यांनी महिलांच्या एकजुटीचे कौतुक करत कोळगावचा हा निर्णय महिलांच्या सन्मानासाठी नवा आदर्श निर्माण करणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
