‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संत तुकोबारायांच्या अभंगाच्या ओव्या जळगावच्या आकाशसाठी तंतोतंत योग्य ठरत आहेत. अवघ्या 23 वर्षाच्या आकाशने यूपीएससी परीक्षेत देशात 73 वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या आई-वडिलांसाठी हे क्षण अत्यंत आनंदाचे आहेत. आई-वडिलांच्या कष्टाचे त्याने चीज केले, अशी भावना जळगावात व्यक्त होत आहेत.
विशेष म्हणजे कोणत्याही क्लास किंवा शिकवणीशिवाय आकाशने हे एवढं मोठं यश संपादीत केलं आहे. आकाशने केवळ जिद्द, परिश्रम आणि स्वअभ्यासाच्या जोरावर अवघ्या 23व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देश पातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. आकाशने आयआयटी कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बी. टेक पदवी मिळवली. त्याची आयआयएम अहमदाबाद या अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षण संस्थेतही निवड झाली होती. पण त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन यशस्वी होण्याचं ध्येय ठेवलं होतं. हे ध्येय गाठण्यात त्याला यश मिळालं आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्याला हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. आकाश जळगावात आल्यानंतर आकाशवाणी चौक ते ओंकारेश्वर मंदिर परिसरातील त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि आमदार सुरेश भोळे यांनी त्याच्यासह कुटुंबियांचे कौतुक केले. दरम्यान सोशल मीडियापासून दूर राहिल्यास आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते, अशी प्रतिक्रिया आकाशने दिली. तसेच माझ्या यशामध्ये विपश्यनेचे देखील खूप महत्त्व असल्याचे आकाशने सांगितले.
IAS बनल्यानंतर आकाशची पहिली प्रतिक्रिया
“सर्वजण माझ्या यशात सहभागी होत आहेत. त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे. त्यांचा आशीर्वाद मला आतापर्यंत मिळाला आहे आणि यापुढेही राहील, असं आकाश त्रिवेदी म्हणाला. यावेळी आकाशला यशाचं गमक काय आहे? असं विचारलं असता, यशाचं गमक असं आहे की, तुम्ही आपली मेहनत करा. यश आपोआप येईल. तुम्ही आपल्या कामावर लक्ष द्या. यश नक्की येईल”, असं आकाशने सांगितलं.
“मी सोशल मीडियाचा वापर करायचो नाही. मी आता सोशल मीडिया वापरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दशेत असताना सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करा कारण त्यामुळे मन विचलित होतं. नंतर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करु शकता”, असं आकाशने विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितलं.
अभ्यास कशा पद्धतीने करायचा? असा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली. “अभ्यासला ओझं म्हणून करु नका. अभ्यासाला एक वेगळी अनुभूती समजून काम करा. तुमचे फाऊंडेशन चांगले असतील तर तुम्हाला अभ्यासाची आवडही होईल आणि तुम्ही अभ्यास चांगलाही कराल”, असं आवाहन आकाशने यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना केलं. “माझ्या या यशाचं श्रेय आई-वडील यांच्यासह माझ्या शाळेचे शिक्षक, नातेवाईक अशा सर्वांना मी श्रेय देईन”, अशी प्रतिक्रिया आकाश त्रिवेदी याने दिली.
आकाशच्या वडिलांची भावनिक प्रतिक्रिया
“आकाशच्या वडिलांचे शब्द खूप काही सांगत होते. वयाच्या 23 व्या वर्षी आकाशने यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्याचा आनंद अक्षरश: शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही असा आहे. पालक म्हणून मी पालकांना सल्ला देईन की, मी मुलाला यशस्वी हो, असं सांगितलं नव्हतं. मी त्याला एक चांगला माणूस हो या अँगलनेच फोकस होतो. त्याच अँगलने मी आणि त्याच्या आईने संस्कार दिले. आकाशची आई पहाटे साडेचार वाजेपासून उठायची. आकाश पाच वर्षाच्या असल्यापासून त्याची आई दररोज त्याला शाळेत सोडायला जाण्यासाठी एरंडोल ते जळगाव असा प्रवास करायची. कानपूर आयआआयटीमध्ये शिक्षण घेत असतानादेखील आकाश पहाटे पाच वाजता उठायचा. हे संस्कार आहेत. सकाळी लवकर उठून तो उडून योगासने करायचा. या सर्व संस्कारांचे क्रेडिट त्याच्या आईलाच जातं”, असं आकाशचे वडील म्हणाले.
आकाशच्या आईची प्रतिक्रिया
“आकाश हा लहानपणापासून आज्ञाधारकच आहे. मला आकाशकडे बघून ‘शामची आई’ पुस्तकातील शामचीच आठवण येते. त्याला चांगल्या गोष्टी शिकायला आणि त्या अनुकरण करायला आवडतात. तो ते अनुकरण करतो. तो IAS झाला तरी तो आतापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय नव्हता. आता निकाल जाहीर झाल्यानंतर तो सोशल मीडियावर सक्रिय झाला”, अशी प्रतिक्रिया आकाशच्या आईने दिली.
