लेकीच्या स्मृतीतून फुलले समाजसेवेचे व्रत
वैशाली विसपुते यांच्या या प्रवासाची सुरुवात एका वैयक्तिक दुःखातून झाली. त्यांच्या मुलीचे जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच निधन झाले. आपल्या लेकीची स्मृती कायम ठेवण्यासाठी त्यांनी २००६ मध्ये ‘निधी फाऊंडेशन’ ची स्थापना केली. सुरुवातीला रिमांड होममधील महिला आणि मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या आयुष्यातील नैराश्य दूर करण्याचे काम त्यांनी हाती घेतले.
एका घटनेने बदलले आयुष्याचे ध्येय: ‘कापडमुक्ती’ अभियान
वैशाली विसपुते यांच्या कार्याला खरी कलाटणी एका शाळकरी मुलीमुळे मिळाली. मासिक पाळीमुळे कपडे खराब झाल्याने ती मुलगी रडत असताना वैशाली यांनी तिची विचारपूस केली. समाजातील ही विदारक स्थिती पाहून त्यांनी ग्रामीण भागात पाहणी केली. तिथे महिला आजही आरोग्याबाबत अनभिज्ञ असून वर्षानुवर्षे एकच कापड वापरत असल्याचे भयानक वास्तव समोर आले. त्याच क्षणी त्यांनी ‘कापडमुक्ती’ आणि मासिक पाळी जनजागृतीचे ध्येय निश्चित केले. गेल्या २० वर्षात जनजागृतीसह शासकीय कार्यालय व शाळांमध्ये नॅपकिन वेडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्याचे काम देखील त्या करीत आहेत.
दत्तक गावे झाली ‘कापडमुक्त’
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी जळगावजवळील ‘पोखरी तांडा’ आणि ‘खापरखेडा’ ही गावे दत्तक घेतली. या गावातील महिलांना वर्षभर मोफत सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देऊन ती गावे पूर्णपणे ‘कापडमुक्त’ केली.
रेल्वे पॅटर्न आणि लॉकडाऊनमधील कार्य
वैशाली यांचे कार्य केवळ जळगावपुरते मर्यादित राहिले नाही. रेल्वे प्रवासात महिलांची होणारी ओढाताण पाहून त्यांनी ‘’रेल्वे पॅड पॅटर्न’साठी थेट पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सर्वकाही बंद होते, तेव्हा महामार्गावरून चालणाऱ्या परप्रांतीय महिलांना आणि निवारागृहातील गरजू मुलींना त्यांनी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. तसेच जळगाव शहरात १० ठिकाणी महिला स्वच्छतागृहे उभारण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.
पुरस्कारांचा वर्षाव आणि भविष्यातील वेध
त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते दिल्लीत त्यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच बहिणाबाई राज्यस्तरीय पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार आणि जळगाव महिला भूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
दरम्यान, “शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे माझ्या दशकाभराच्या संघर्षाची पावती आहे. आता रेल्वे आणि विमानांमध्येही ही सुविधा मिळावी, यासाठी माझा लढा सुरूच राहील. दुर्गम, ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्र कापडमुक्त करण्याचा माझा संकल्प आहे,” असं वैशाली विसपुते यांनी म्हटलं आहे.