• Fri. Mar 6th, 2026
    Sagar Mohalkar : जामखेडमथ्ये गुंड सागर मोहळकरवर गोळीबारानंतर रोहित पवारांचं पहिलं ट्विट, गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी

    जामखेड शहर आज गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. कुख्यात गुंड सागर मोहळकर याच्यावर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेडमध्ये गुंड सागर मोहळकर याच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड शहरातील न्युरानी कॉलनीत बुधवारी सायंकाळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी सागरवर गोळ्या झाडल्या. कुख्यात सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोराने सात राऊंड फायर केले. यापैकी चार गोळ्या अंगात घुसल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी या घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनावर जोरदार शब्दांत निशाणा साधला. “माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये गेल्या काही काळापासून गुन्हेगारी वेगाने फोफावत आहे. गुन्हेगारांकडून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात अनेकदा आवाज उठवला तरी या घटनांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला यश आलेलं नाही”, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले.

    “आजही सागर मोहोळकर या तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून तो गंभीर जखमी आहे. पोलीस प्रशासनाने हे गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांचा समूळ नायनाट करावा आणि सामान्य माणसासाठी दहशतमुक्त वातावरण निर्माण करावं. तसंच सरकारनेही या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं, ही विनंती”, अशी मागणी रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

    सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृह येथून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर 307 सह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता आमदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या ट्विटनंतर आता सर्वांचे लक्ष पोलीस प्रशासन आणि सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा