इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे अनेक भारतीय हे आखाती देशांमध्ये अडकले आहेत. त्यापैकी अनेक पर्यटक आता भारतात परतत आहेत. यापैकी संगमनेरचे संजय मालपाणी हे आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
संगमनेर : आखातातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अबू धाबी येथे अडकलेल्या संगमनेरच्या संजय मालपाणी यांचा अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इराण विरुद्ध इस्त्रायल तसेच अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आखातात तणाव निर्माण झाला आणि अनेक उड्डाणे रद्द झाली. या पार्श्वभूमीवर मालपाणी काही दिवस संयुक्त अरब अमिरातमध्येच अडकून पडले. ते वैवाहिक कार्यक्रमासाठी अबू धाबीला गेले होते. अचानक विमानसेवा ठप्प झाल्याने परतीचा मार्ग बंद झाला. मात्र ते ज्या आलिशान Emirates Palace Mandarin Oriental हॉटेलमध्ये थांबले होते, तेथील व्यवस्थापनाने “तुम्ही आमच्या देशाचे पाहुणे आहात” असे सांगत निवास व भोजनाची जबाबदारी सरकारकडून घेतल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. युद्धकाळातही परदेशी पाहुण्यांची अशी काळजी घेतली जात असल्याचा अनुभव त्यांच्यासाठी अनपेक्षित दिलासा ठरला.
रात्री त्यांच्या मोबाईलवर सरकारकडून सतर्कतेचे अलर्ट मेसेज येत होते. बाहेर न पडण्याच्या आणि खिडक्यांचे पडदा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शहरात भीतीचे वातावरण जाणवत नव्हते. रस्त्यांवरील वाहतूक नियमित सुरू होती, बाजारपेठा आणि मॉल्स उघडे होते आणि रमजानच्या रोषणाईने शहर उजळले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी शहरातील काही ठिकाणांना भेट दिली. बहुतांश पर्यटनस्थळे सुरू होती; केवळ BAPS Hindu Mandir Abu Dhabi बंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या पोस्टमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांच्या कव्हरेजबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. “टीव्हीवर बाँबवर्षाव, पण बाहेर शांतता,” असे त्यांनी लिहित माध्यमांच्या अतिनाट्यमय सादरीकरणावर अप्रत्यक्ष टीका केली. वारंवार दाखवले जाणारे क्षेपणास्त्रांचे दृश्य आणि ‘ब्रेकिंग न्यूज’चा गजर पाहून भारतातील नातेवाईकांची चिंता वाढली होती. “टीव्ही बंद केला आणि जणू युद्ध थांबल्यासारखे वाटले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, त्यांच्या वृद्ध आईची चिंता अधिकच वाढली होती. व्हिडिओ कॉलवर मुलगा सुरक्षित असल्याचे पाहून तिचा जीव भांड्यात पडला, तरीही तो मायदेशी परत येईपर्यंत काळजी कायम होती. काही दिवसांनी विमानसेवा सुरू झाली आणि त्यांनी हैदराबादमार्गे भारत गाठला. Sagar Mohalkar : जामखेडमध्ये निलेश घायवळवरच्या कानशिलात लगावणाऱ्या गुंड सागर मोहळकरवर गोळीबार पोस्टच्या शेवटी त्यांनी श्रीरामोक्तीचा उल्लेख करत “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान” असल्याची भावना व्यक्त केली. “स्वर्णमयी लंका नको, मला माझी मातृभूमी हवी,” असे म्हणत त्यांनी परतीच्या प्रवासातील भावनिक क्षण मांडले. युद्धाच्या छायेतून परतताना मातृभूमीची ओढ अधिक तीव्रतेने जाणवल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांची ही भावनिक आणि वास्तववादी पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत सुरक्षित परतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर परदेशातील अनुभव आणि मायदेशी परतण्याची ओढ यांचा संगम असलेली ही कहाणी अनेकांच्या मनाला भिडत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा