Nanded Crime : CRS पोर्टल हॅक अन् 1,700 लोकसंख्येच्या गावात 15,569 बोगस जन्म नोंदी; नांदेडमधील प्रकार
कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावातील बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे कनेक्शन झारखंड असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी उस्माननगर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत झारखंड राज्यातील पाच आरोपीना ताब्यात घेतले. आरोपीनी सीआरएस पोर्टलची युजर आयडी हॅक करून तब्बल 15 हजार 569 बनावट जन्म प्रमाणपत्र वाटप केले होते. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आणि आयपी ऍड्रेसच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळळ्या. जितेंद्र कुमारसिंह महेंद्र प्रसादसिंह, ओमप्रकाश उमेश मिश्रा, लक्ष्मी अमीतकुमार पंडित, सुमीत कुमार निर्मल सिंह आणि सतिश कुमार भवानी शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. हे सर्व आरोपी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील रहिवासी आहे.
