• Fri. Mar 6th, 2026
    कात्रजला जायचंय, रिक्षा इथे का नेता? वादावादीत महिलेला संपवलं, पोलिसांनी 97 सीसीटीव्ही फूटेज तपासले, अखेर गूढ उकललंच

    Pune Woman Murder Case : दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर कात्रजमधील महिलेला खाणीत ढकलून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कात्रज येथील मांगडेवाडी परिसरातील दगडांच्या खाणीत मृतदेह आढळलेल्या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर महिलेला खाणीत ढकलून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ९७ सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून ३५ संशयित वाहने निवडत पोलिसांनी तपास केला.

    केशव कमलेश चौधरी (वय २०), सोन्या लक्ष्मण पवार (वय १८), अब्दुल महंमद शेख (वय २३), महादेव अर्जुन व्होरडे (वय ४०), साई अमित पुजारी (वय १९) आणि सोहेल हनिफ खान (वय २१) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनच्या पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    नेमकं काय घडलं?

    मांगडेवाडीतील दगडांच्या खाणीत १० फेब्रुवारीला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आणि समांतर तपास सुरू केला. तपासात महिलेला रिक्षामधून कोंढव्याहून कात्रजला नेण्याच्या बहाण्याने आरोपींनी खाण परिसरात आणले. तेथे इतर तीन साथीदारांना बोलावून दारू पार्टी केली.

    महिलेने जाब विचारताच मारहाण

    कात्रजला न नेता येथे का आणले, असा जाब महिलेने विचारल्यानंतर वाद झाला आणि आरोपींनी तिला मारहाण करून खाणीत ढकलल्याचे चौकशीत उघड झाले. पोलिसांनी सांगितले, की मृत महिला देहविक्री करीत होती. कोंढव्यातून कात्रजला जाण्यासाठी तिने रिक्षा थांबवली होती. मात्र, आरोपींनी शॉर्टकट असल्याचे सांगून रिक्षा मांगडेवाडी खाण परिसरात नेली. तेथे झालेल्या वादातून ही घटना घडली.

    ९७ सीसीटीव्ही फुटेज, ३५ संशयित वाहने

    गुन्हे शाखेने ९७ सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून ३५ संशयित वाहने निवडली. तपासात केशव चौधरीपर्यंत पोलिस पोहोचले. तो रिक्षाचालक असून, त्याने रिक्षाच्या हूडमध्ये बदल केल्याचेही आढळले. चौकशीत त्याने खूनाची कबुली दिली आणि इतर साथीदारांची नावे उघड केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा