• Mon. Sep 7th, 2026
Nanded News: 22 नातवंडे असलेला 82 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक अडकला विवाहबंधनात; म्हणाले, मी लग्न करतोय, कारण…

Nanded Old Man Marriage News: वृद्धापकाळात घेतलेल्या त्यांच्या या पुनर्विवाहाचा विषय चर्चेचा ठरत आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकाने घेतलेल्या या निर्णयावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत असल्या तरी त्यांच्या मित्रमंडळींनी स्वागत करत त्यांचा सत्कार केला आहे.

82 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक अडकला विवाहबंधनात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड : माणसाला आयुष्यभर सोबत आणि आधाराची गरज असते. आयुष्याच्या उत्तरार्धात ही पोकळी अधिक जाणवते. या एकाकीपणावर मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील 82 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांना तीन मुले, तीन सुना, तीन मुली, तीन जावई, आणि चक्क 22 नातवंडे आहेत. मुलांच्या संमतीने आजोबांनी 56 वर्षीय महिलेसोबत विवाह केला आहे. चौधरी शेख हुसेन शेख अहमद, असे विवाह केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचं नाव आहे. आजोबांच्या या विवाहाची जिल्ह्याभरात चर्चा होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चौधरी शेख हुसेन शेख अहमद हे मूळचे माहूर तालुक्यातील रहिवासी असून धर्माबाद तालुक्यात उर्दू माध्यमाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तिथेचं वास्तव्यास होतेले. 22 वर्षांपूर्वी शेख हुसेन चौधरी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा खादरबी हुसेन साहेब यांच्या सोबत पहिला विवाह झाला होता. त्यांना तीन मुले, तीन मुली, सुना,जावई आणि तब्बल 22 नातवंडे झाली आहेत. त्यापैकी काही नातवांचेही लग्न झालेली आहेत. दरम्यान काळात पत्नीचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले. ते मुलं आणि सुनांबरोबर राहत असले तरी मनात एकटेपणाची जाणीव होती. तेव्हा त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुलांसमोर त्यांनी ही इच्छा जाणून दाखवली, सुरुवातीला मुलांनी विरोध केला. पण वडिलांच्या आनंदासाठी कुटुंबीयांनी सहमती दर्शवली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी तेलंगाना राज्यातील भैंसा येथील येथे वास्तव्यात असलेल्या अमिनाबेगम अहमद हुसेन यांच्याशी विवाह केला.

दरम्यान, “माणसाला आयुष्यभर सोबतीची गरज असते. उर्वरित आयुष्य आनंदात आणि समाधानाने घालवायचे आहे. कुटुंबीय आहे पण साथीदार हा साथीदारच असतो. आता नूतन पत्नी अमिना ही माझ्यासाठी मोठी ताकद असेल. माझ्यानंतर माझी पेन्शन घेईल व माझ्या नावाने जगेल,” असे मत चौधरी हुसेन यांनी व्यक्त केले आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.आणखी वाचा