• Mon. Mar 9th, 2026

    Maharashtra Politics: सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता ‘हाता’तून गेली; काँग्रेसचे 2 बडे नेते गोत्यात, कारवाई होणार

    Maharashtra Politics: सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता ‘हाता’तून गेली; काँग्रेसचे 2 बडे नेते गोत्यात, कारवाई होणार

    Maharashtra Congress: सर्वात मोठा पक्ष ठरुनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसवर सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/चंद्रपूर: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं. सर्वाधिक मोठा पक्ष ठरुनही काँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसला. त्यामुळे हातातोंडाशी आलेली सत्ता पक्षाला गमवावी लागली. आधीच राज्यभरात पिछेहाट सुरु असताना चंद्रपुरात काँग्रेसनं संधी असताना अंतर्गत गटबाजीनं काँग्रेसचा घात केला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांची चौकशी होणार आहे. याचा अहवाल दिल्लीतील हायकमांडला पाठवला जाईल.

    चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारीला लागला. ६६ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या. तर भाजपला २३ जागांवर यश मिळालं. सत्ता स्थापनेसाठी ३४ चा आकडा गाठणं गरजेचं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेनं ६ जागा मिळवल्या होत्या. त्यांच्या साथीनं सत्तेचा सोपान गाठणं काँग्रेसला शक्य होतं. पण अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसनं सत्ता गमावली. काँग्रेसमधील बेबनावाचा फायदा घेत भाजपनं चंद्रपुरात सत्ता आणली.

    काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील संघर्षामुळे पक्षाच्या हातून सत्ता निसटली. या दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या गटातील नगरसेवकांची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केली. दोन दिग्गज नेत्यांमधील खेचाखेची बरेच दिवस सुरु राहिली. त्यामुळे काँग्रेसच्या हातून सत्ता गेली.

    राज्यभरातील महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी सुमार झाली. त्यात चंद्रपुररमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी असलेली संधी गमावली. आता या प्रकरणी खासदार प्रतिमा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई होणार आहे. यासंदर्भात दिल्लीतील हायकमांडला अहवाल सोपवला जाईल.

    मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत चंद्रपुरात झालेल्या अंतर्गत गटबाजीचा विषय उपस्थित झाला. गटबाजीमुळे महापालिकेतील सत्ता गेल्याबद्दल चर्चा झाली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. त्याचा अहवाल दिल्लीला पाठवला जाणार आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा