Raj Thackeray Meets Eknath Shinde: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच शिंदेंची भेट घेतली आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी, बैठका याआधीही झालेल्या आहेत. पण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट केली होती. त्यात त्यांनी एका परिच्छेदात लवचिक भूमिकेचा उल्लेख केला होता. विशेष म्हणजे ही पोस्ट करण्याच्या काही दिवस आधीच मनसेनं कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता झालेली राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट याच लवचिक भूमिकेची भाग आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
ठाकरे बंधूंनी युती करुन महापालिका निवडणुका लढवल्या. पण एकाही पालिकेत त्यांच्या महायुतीला सत्ता मिळाली नाही. मुंबईतही शिवसेना उबाठा-मनसे युती बहुमतापासून बरीच लांब राहिली. मुंबईत युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांनाच अधिक झाल्याची चर्चा झाली. मनसेला केवळ सहा जागा मिळाल्या. तर शिवसेना उबाठाला ६५ जागांवर यश मिळालं.
महापालिका निवडणुकांच्या निकालांनंतर कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत प्रवेश केला. यावरुन शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. पण दुसरीकडे चंद्रपुरात शिवसेना उबाठानं भाजपला साथ दिली. त्यामुळे ठाकरेंच्या युतीतील बेबनाव ठळकपणे समोर आला. त्यानंतर आता राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी ही भेट झाली.
