Baramati Elections: बारामतीकरांच्या विश्वासावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाची ग्वाही दिली. सरकारमध्ये असो वा नसो, बारामतीसाठी काम करण्याची तळमळ कायम असल्याचे सांगत, पुढील पाच वर्षांची जबाबदारी आपल्यावर सोपवण्याचे आवाहन त्यांनी केले.
बारामती नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सांगता सभेत अजित पवार बोलत होते. या वेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव; तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. बारामती नगर परिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ रोजी निकाल असून, या ठिकाणी आठ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. ३३ जागांसाठी मतदान होणार आहे.
Ajit Pawar : ‘घरातील लोक सुद्धा साथ देत नाहीत’, अजित पवारांनी बारामतीकरांसमोर उघडपणे व्यक्त केली उद्विग्नता
अजित पवार म्हणाले, ‘उद्या लोक विचार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील, म्हणून आजच सभा घेत आहे. मी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा कार्यकर्ता आहे. जाती-धर्माच्या आधारे राजकारण करणे ही माझी संस्कृती नाही. बारामतीत कधीही जातीय वा धार्मिक तेढ निर्माण झाली नाही, आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला एकोप्याची शिकवण दिली आहे. हीच बारामतीची ताकद आहे. नगर परिषद निवडणुकीत आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ३३ जागांसाठी माझ्या विचाराच्या उमेदवारांना मतदान करा.’
‘बारामती शहरात विकासकामे करताना तुमची साथ गरजेची आहे. विरोधक फक्त निवडणुकीपुरते येतात. एका हाताने टाळी वाजत नाही,’ अशा शब्दांत पवार यांनी टीका केली.
‘सिंगापूरच्या धर्तीवर बारामती स्मार्ट सिटी करण्याचा मानस आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पवारसाहेबांसह अनेकांनी लक्ष घातले आहे. ही काळाची गरज आहे. बारामती नगर परिषदेचे कामकाज हायटेक करणार आहे, आगामी काळात नागरिकांना नगर परिषदेत हेलपाटे मारायला लागू नये असा विचार मी एक कुटुंब म्हणून करीत आहे,’ अजित पवार, उपमुख्यमंत्री
Ajit Pawar | फडणवीसांकडून युती तुटल्याची घोषणा, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
‘…तर माझीच जिरवणूक होईल’
‘मला ४१ पैकी ४१ नगरसेवक निवडून द्या. नगर परिषदेत नगरसेवक कमी आले, तर ती जबाबदारी माझीच असते. आपसात एकमेकांची जिरवायला गेलात, तर माझीच जिरवणूक होईल,’ असे सूचक विधान अजित पवार यांनी केले. ‘बाहेरची माणसे येऊन तुमचे आणि माझे बरे-वाईट सांगतील; पण बारामतीत काय होणार आहे, याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. बाहेरच्यांचा अजिबात नाद करू नका; फक्त माझा नाद करा,’ असे आवाहनही पवार यांनी केले.
