Pune Airport: इंडिगो विमानसेवेतील बिघाडामुळे पुणेकरांना मोठा फटका बसला आहे. इतर कंपन्यांची तिकिटे महागली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे विभागाने बेंगळुरू, हैदराबाद आणि हिसारसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. विमानतळावर मदत कक्षही उभारण्यात आला आहे.
‘इंडिगो’ची विमाने रद्द झाल्यामुळे इतर कंपन्यांची तिकीटे महागली आहेत; तसेच विमानतळ परिसरातील हॉटेलचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या पर्यायाने प्रवास कसा करता येईल, या मदतीसाठी पुणे रेल्वे विभागाने विमानतळावर मदत कक्ष सुरू केला आहे. या ठिकाणी रेल्वेचे दोन अधिकारी कायम उपस्थित असणार आहेत. ते विमान रद्द झाल्यास रेल्वेने कसा प्रवास करता येईल, याची माहिती प्रवाशांना देत आहेत.
इंडिगोमुळे प्रवास ठप्प, रेल्वे धावून आली प्रवाशांच्या मदतीला; मध्य रेल्वेसह देशभरातून 89 विशेष गाड्या, पाहा संपूर्ण यादी
पुण्यातून तीन शहरांसाठी रेल्वे
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे विभागाकडून बेंगळुरू, हैदराबाद आणि हिसारदरम्यान विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०६२६४ पुणे-बेंगळुरू स्पेशल गाडी आठ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. ही गाडी दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, शहाबाद, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, अडोनी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर मार्गे जाणार आहे.
गाडी क्रमांक ०७१६८ हडपसर-हैदराबाद विशेष गाडी हडपसर येथून आठ डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पावणेपाच वाजता हैदराबाद येथे पोहोचेल. ही गाडी अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, पूर्णा, परभणी, नांदेड, मुदखेड, निजामाबाद, कामारेड्डी आणि सिकंदराबादमार्गे जाणार आहे. गाडी क्रमांक ०४७२६ खडकी-हिसार स्पेशल गाडी आठ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता खडकी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजून २५ मिनिटांनी हिसार येथे पोहोचेल.
इंदापूरमध्ये मतदान केंद्रावर दोन गटात राडा; पोलिसांची धावपळ, स्थिती नियंत्रणात!
26 विमाने रद्द
पुणे विमानतळावरून जाणारी आणि येणारी ‘इंडिगो’ची २६ विमाने रविवारी रद्द झाली. यामुळे हजारो प्रवाशांना रविवारीदेखील फटका सहन करावा लागला; तसेच प्रवाशांच्या सामानाचाही रविवारी गोंधळ झाल्याचे दिसून आले. विमानकंपनीच्या गोंधळा फटका पुण्यातून नागपूरला जाणाऱ्या अनेक आमदारांनाही बसल्याचे दिसून आले. पुण्यातून दिल्ली, बेंगळुरू, पटना, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, इंदौर, डेहराडून, राजकोट, सूरत या शहरांसाठी जाणारी आणि पुण्यात येणारी विमाने रविवारी रद्द झाली, तर काही शहरांसाठीची विमाने उशिराने धावत होती.
