Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहेत. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात वादाला फोडणी मिळाली आहे. यातच सुप्रिया सुळेंनी मात्र रोहिणी खडसेंची बाजू सावरली आहे. तर ससून रुग्णालयाच्या रिपोर्ट बाबत भीती व्यक्त केली आहे.
प्रांजल येवलकरांच्या अटकेमुळे रोहिणी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. पण सुप्रिया सुळेंनी मात्र आपण आणि पक्ष त्यांच्या मागे ठाम उभे राहणार असल्याचे भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहिणींचा या प्रकरणाशी काय संबंध? त्यांचा नवरा प्रकरणात आहे, मग त्यांचा राजीनामा घ्यायचा का?
सुप्रिया सुळेंनी एक महिला म्हणून खडसेंची बाजू सावरली आहे. ‘एखादी महिला सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना काय त्रास होतोय. काल माधुरी मिसाळ यांच्या बाबत शिरसाट यांनी लिहिलेल पत्र पाहिलं. ती महिला सक्षम आहे. तिला अधिकार आहे बैठका घेण्याचा. मग तुमच्या पोटात का दुखतंय?’ अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे.
खडसेंचे जावई अटकेत असल्याने वादाला फोडणी
राज्यात हनीट्रॅप प्रकरणावरुन वाद सुरु आहे, एकनाथ खडसेंनी महायुतीच्या नेत्यांना धारेवर धरले आहे. त्यानंतर रेव्ह पार्टीसारख्या गंभीर प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल येवलकर अडकल्याने राजकीय वादाला फोडणी मिळाली आहे. उच्चभ्रू वस्तीमध्ये ही पार्टी सुरु होती. पार्टीत ५ पुरूष आणि २ महिलांचा समावेश होता. त्यांना आता पुणे कोर्टाकडून २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

