• Mon. Mar 9th, 2026

    ‘महाराष्ट्राच्या मनात काय ते तुम्हाला दिसेल’, राज-उद्धव भेटीवर फडणवीसांची बोलकी प्रतिक्रिया

    ‘महाराष्ट्राच्या मनात काय ते तुम्हाला दिसेल’, राज-उद्धव भेटीवर फडणवीसांची बोलकी प्रतिक्रिया

    Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले. तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटरवॉर झालेलं बघायला मिळालं. तर तिसरी मोठी घटना म्हणजे पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकनाथ खडसे यांच्या जावायाला अटक करण्यात आली. या तीनही घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया आज दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटीला गेले. त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले. आनंदाची गोष्ट आहे. यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं? शुभेच्छा द्यायला गेले असतील तर आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं यात राजकारण पाहणं योग्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे हे तुम्हा या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसेल. पण काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे, असं म्हणणं योग्य नाहीय. फार मोठं वक्तव्य होईल”, अशी देखील प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्या लेटरवॉर फडणवीसांची प्रतिक्रिया

    “मंत्र्यांनी अशा प्रकारे पत्र लिहून वाद निर्माण करु नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं. मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्यात. म्हणजे त्यातल्या अडचणी आपल्या दूर करता येतील. शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघेही शासनाचे भाग असतात. सगळे अधिकार मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे याबाबत कोणतंही कन्फ्युजन नाही. पण राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असं मानणं चुकीचं आहे”, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    “राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जे धोरणात्मक निर्णय असतील, ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही. त्यासाठी मंत्र्यांची मान्यता लागते. मंत्री आणि राज्यमंत्री दोघांनी सामंजस्य दाखवलं पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्या.

    पुण्यातल्या रेव्ह पार्टीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

    “मी पण हे माध्यमातच पाहिलं आहे. आपण स्वत: बघितलं की, मी सुद्धा सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे. त्यामुळे मला त्याचं ब्रिफिंग घेता आलेलं नाही. पण माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एक रेव्ह पार्टीवर कारवाई केली आहे. त्यामध्ये काही लोक सापडले आहेत. त्यामध्ये ड्रग्ज सापडले आहेत. आता मी याबाबत पूर्ण माहिती घेईन त्यावेळी त्यार बोलेन. पण प्राथमिक अशा स्वरुपाचा गुन्हा घडला असं दिसतंय”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा