Anil Thatte on Eknath Khadse and Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले, ज्यात एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा दावा केला. या आरोपांमुळे संतप्त झालेल्या गिरीश महाजन यांनी खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. यानंतर आता अनिल थत्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकनाथ खडसे यांनी माझ्या मूळ व्हिडीओचा राजकीय हेतूने विपर्यास केला, असं अनिल थत्ते म्हणाले आहेत. खडसेंनी महाजनांबाबत केलेलं बदनामकारक वक्तव्य माझ्या व्हिडीओत नाही, असं अनिल थत्ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात किती दशकांपासूनचं वैर आहे. एकनाथ खडसे यांनी काय केलं, त्यांनी माझ्या मूळ व्हिडीओतील विधाने मोडून तोडून थोडी वाढवली. खडसेंनी माझ्या वक्तव्यांचा विपर्यास केला. माझी दोन विधाने सरळ होती, जी मी कोर्टात सिद्ध करु शकतो. ते मी कोर्टात सिद्ध करणार”, अशी प्रतिक्रिया अनिल थत्ते यांनी टीव्ही 9 मराठी वृत्त वाहिनीला दिली आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया काय?
एकनाथ खडसे यांची या प्रकरणात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण आपल्याला अजूनपर्यंत कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस आल्यावर प्रतिक्रिया देऊ, असं खडसे पत्रकारांना म्हणाल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष होत असतो. दोन्ही नेते एकाच पक्षात असताना त्यांच्यात शितयुद्ध होतं. पण खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उघडपणे संघर्ष बघायला मिळाला.