• Mon. Jun 15th, 2026
    Nagpur Crime: पाचवीच्या विद्यार्थिनीचे गणित चुकले, शिक्षकाकडून अमानुष मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

    Nagpur Crime: कुही तालुक्यातील देवळी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.

    शिक्षकाची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून शिक्षकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केली. ही खळबळजनक व तेवढीच संतापजनक घटना कुही तालुक्यातील देवळी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    मनोहर वाडीभस्मे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चाइल्ड हेल्पलाइनच्या मीनाक्षी धडाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

    Maharashtra TimesNagpur News : पाणी मागितल्याचा गैरसमज; ‘मुलं चोरणारी’ समजून वृद्ध महिलेला मारहाण, पोलिसांनी वाचवला जीव
    प्राप्त माहितीनुसार, १० मार्च रोजी वर्गात गणिताचा तास सुरू होता. यावेळी वाडीभस्मे यांनी एका विद्यार्थिनीला उत्तर विचारले. तिने चुकीचे उत्तर दिले. त्यामुळे वाडीभस्मे संतापले. त्यांनी विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केली. हे प्रकरण दाबण्यासाठी वाडीभस्मे यांनी विद्यार्थिनीच्या वडिलांवर दबाव टाकून तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. तसेच कोऱ्या कागदावर त्यांची स्वाक्षरीही घेतली.

    Maharashtra TimesNagpur News: बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ५ राज्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस
    दरम्यान, हे प्रकरण चाइल्ड हेल्पलाइनला कळले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पर्यवेक्षक अनिकेत भिवगडे व मीनाक्षी धडाडे या गावात गेल्या. त्यांनी वडिलांना विश्वासात घेत त्यांची चौकशी केली. वाडीभस्मे यांनी मुलीला मारहाण करून प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर धडाडे यांनी वेलतूर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच पालकांना धमकी दिल्याची बाब चौकशीत समोर आली. ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा