• Fri. Mar 20th, 2026

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाची स्थिती, उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाची स्थिती, उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

    Weather Alert: विदर्भात रविवारपासून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने नोंदवली आहे. त्यामुळे तापमानात घट होऊ शकेल.

    हवामान अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांना शनिवारीही उष्ण झळांची जाणीव झाली. मात्र शुक्रवारपेक्षा कमाल तापमानाचा पारा सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर खाली आला होता. येत्या आठवड्यात मुंबईमध्ये ३३ अंशांदरम्यान कमाल तापमान नोंदले जाईल, अशी शक्यता आहे. अरबी समुद्र आणि विदर्भाजवळ प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. सह्याद्रीच्या पलीकडे वारा खंडितता प्रणाली निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण झाली असून, याचा परिणाम कोकणातील उष्णता कमी होण्यावरही होण्याचा अंदाज आहे.

    सांताक्रूझ येथे शनिवारी ३५, तर कुलाबा येथे ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मुंबईचे कमाल तापमान सरासरीपेक्षा शनिवारी सांताक्रूझ येथे १.८, तर कुलाबा येथे १.९ अंशांनी अधिक होते. हा पारा रविवारी आणखी खाली उतरेल, असा अंदाज आहे. डहाणू येथे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी अधिक होते. विदर्भातही तुरळक ठिकाणी शनिवारी उष्णतेची लाट जाणवण्याचा अंदाज दिला होता. अकोला येथे राज्यात सर्वाधिक म्हणजे ४१.६ अंश सेल्सिअस, तर वर्धा येथे ४०.९, अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

    उत्तर कोकणामध्ये रविवार ते बुधवार या कालावधीत वातावरण कोरडे असू शकेल. सोमवार, १६ मार्चला सिंधुदुर्गात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर येथेही सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे, तर पुणे जिल्ह्यात रविवार ते मंगळवार या कालावधीत हलक्या सरींचा अंदाज आहे. कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर येथे सोमवारी, सातारा, सांगली, घाट परिसर येथे रविवार, सोमवारी, सोलापूर येथे रविवार ते बुधवार या कालावधीत ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बीड येथे रविवारी, सोमवारी, परभणी येथे सोमवार ते बुधवार, हिंगोली, नांदेड येथे मंगळवार आणि बुधवारी तर लातूर, धाराशिव येथे रविवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांना या दिवसांसाठी ‘यलो अॅलर्ट’ आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रविवारपासून, गोंदिया, यवतमाळला सोमवारपासून ‘यलो अॅलर्ट’ आहे, तर अकोला आणि अमरावतीमध्ये रविवारीही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा