Nitin Gadkari Slams Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाच्या नवीन विभागीय कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाची परंपरा कायम ठेवत पक्षातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गडकरी म्हणाले, ‘मी जेव्हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हा अनेक जातीय प्रकोष्ठ स्थापन केले होते. त्यावेळी अनेकांनी याला विरोध केला, पण मी सर्व जाती एकत्र याव्यात या उद्देशाने हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कोणतीही जात यामुळे पक्षात स्थायिक झाली नाही.’
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘याउलट, पक्षात आलेले जातीय नेते त्यांच्या समाजातच एकटे पडले. त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला नाही. त्यामुळे या प्रकोष्ठांनी पक्षाच्या विस्तारात ठोस योगदान दिले नाही.’ गडकरींच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये काहीसे गांभीर्याचे वातावरण पसरले.
गडकरी यांनी बावनकुळेंना सूचित करत सांगितले की, ‘महानगरपालिका निवडणुका आल्या की, तुम्हाला या प्रकोष्ठांकडून शेकडो शिफारसीच्या चिठ्ठ्या मिळतील. तेव्हा तुम्हालाही जाणवेल की जातीय प्रकोष्ठ स्थापन करणे ही मोठी चूक होती.’ त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित ही स्पष्टोक्ती मांडत एकप्रकारे भविष्यातील धोरणांसाठी दिशा दिली.
या कार्यक्रमात गडकरींनी नवीन कार्यालय उभारण्यासाठी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी जुन्या कार्यालयाच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ‘ही जागा मिळवताना खूप अडचणी आल्या, पण आज हे स्वप्न पूर्ण होत आहे.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ५ लाख रुपयांचे योगदान जाहीर करत, नवीन कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाल परिसरात ३८,००० चौरस फूट क्षेत्रात हे कार्यालय उभे राहणार असून, त्यात ५०० लोकांच्या क्षमतेचा हॉल, प्रशिक्षणासाठी दोन स्वतंत्र हॉल, दोन बेसमेंट पार्किंग्स आणि टेरेसवरील बैठक व्यवस्थेसह आधुनिक सुविधा असतील. येत्या दोन वर्षांत हे कार्यालय पूर्ण होणार आहे.