• Fri. Apr 25th, 2025 1:52:19 PM
    शेतकऱ्यांच्या आशेवर ‘पाणी’; जळगावसह येवल्यात पुन्हा ‘अवकाळी’चा मारा, निफाडमध्ये गारपीट

    Unseasonal Rain Crop Loss: द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले

    हायलाइट्स:

    • द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे नुकसान
    • द्राक्षांची काढणी सुरू असतानाच तडाखा
    • चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी
    महाराष्ट्र टाइम्स
    unseasonal crop loss

    म. टा. वृत्तसेवा, निफाड : निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी परिसरात रविवारी (दि. १३) दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अवकाळीसह गारांचा जोरदार पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे नुकसान झाले. या भागात द्राक्षांची काढणी सुरू असतानाच गारांसह पावसाने आठवडाभरानंतर पुन्हा एकदा तडाखा दिला. त्यामुळे द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले.रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा वडनेर भैरवसह मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या भागास बसला. शिरवाडे वणी परिसरात वीस मिनिटे अवकाळी पाऊस झाल्याने बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. शिरवाडे वणी-गोरठाण रस्त्यालगत पाऊस आणि गारा यांच्या माऱ्यामुळे शेवटच्या टप्प्यात काढणीला आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान केले. याबरोबरच कांदा आणि गहू पिकांचेही काही भागात नुकसान झाले. शिरवाडे वणी येथील काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांमध्ये द्राक्ष काढणी सुरू असताना अचानक पाऊस आल्याने धावपळ झाली. शेतकऱ्यांना ऐनवेळी इतरांची मदत घेऊन तातडीने जमेल तेवढी द्राक्ष काढून घेण्यासाठी तारांबळ उडाली.

    येवल्यात सलग दुसऱ्या दिवशी हजेरी
    येवला :
    तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या उन्हाळ कांदा कढणीला आला असून, काही ठिकाणी कांदा काढणीचे कामही सुरू आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली, तर या पावसाने कांद्यासह इतर पिकांचेही नुकसान झाले. रविवारी, (दि. १३) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे परिसरात गारांसह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी काढलेला कांदा भिजला. तर काढणीला आलेल्या कांद्याच्या पातीत पाणी शिरल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. दरम्यान, शनिवारी (दि. १२) सायंकाळी नांदूर, सुकी, बाभूळगाव परिसरात गारांचा पाऊस झाला, तर येवला शहरासह कोटमगाव, धामोडे, भाटगाव, अंदरसूल, धुळगाव, अंतरवेली, सावरगाव परिसरातही पाऊस झाला. येवल्यातील हिंदुस्तानी मशिदीच्या मिनारवर वीज कोसळल्याने मिनारच्या काही भागाचे नुकसान झाले.

    जळगावात केळी बागांचे नुकसान
    जळगाव :
    जिल्ह्यात रविवारी (दि. १३) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसासह गारपीटने झोडपून काढले. रावेर, चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील बहतांश भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चोपडा व यावल तालुक्यातील धानोरा हरिपुरा या गावात काहीवेळ गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे दोन दिवसात १ हजार हेक्टरवरील दादर, बाजरी, मका व केळी पिकांचे नुकसान झाले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed