Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरात मोठ्या बहिणीचा साखरपुड्याला एक दिवस बाकी असताना छोटीचा मृतदेह सापडला होता. या हत्येचे गूढ उकलले असून काय घडलं ते जाणून घ्या.
मांजरेवाडी (ता. खेड) येथे अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी सापडला होता. पोलिसांच्या तपासात खून करून तिचा मृतदेह नदीत टाकून दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. नवनाथ कैलास मांजरे (वय २९, रा. मांजरेवाडी धर्म, ता. खेड) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शुक्रवारी (ता. ११) सकाळी ती महाविद्यालयात आली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रस्त्यावर थांबली असता, आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला. घरी यायचे का, असे म्हणून त्याने तिला दुचाकीवर बसविले. त्यानंतर, मला उसाच्या शेताला पाणी द्यायचे आहे, असे सांगून त्याने तिला मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात नेले. आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतर तिचा मृतदेह ओढत नेऊन शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात टाकला. दरम्यान, ‘मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का नाही, याबाबत शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे,’ अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी दिली.
दरम्यान, रविवारी (ता. १३) पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, आदल्या दिवशीच छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.