Thieves Robbed The House : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या हातगाव या गावात राहणारे अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरात रात्री आठच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शिरकाव केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधत कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे ४ ते ५ लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश होता.
काय घडलं नेमकं?
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या हातगाव या गावात राहणारे अशोक नामदेवराव बोळे यांच्या घरात रात्री आठच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शिरकाव केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधत कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे ४ ते ५ लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा समावेश होता. काही वेळाने बोळे कुटुंबीयांना घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच अशोक बोळे यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र, घराजवळ पोहोचण्याआधीच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. लगेचच स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आयुष्यभराच्या जमापुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजताच अशोक बोळेंना खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या मनावर आलेला ताण इतका वाढला की त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मूर्तिजापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे पंचनामा करत तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत.
चोरट्यांचा अजुनही मागमूस लागलेला नसून, पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शेजारील लोकांची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.