Nashik Retired Teacher Accident : देवजी अपघातानंतर अर्धा तास महामर्गावर जखमी अवस्थेत पडून होते. सुरुवातीला त्यांनी मदतीसाठी याचना करूनही कोणी पुढाकार घेतला नाही. महामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली.
देवजी हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५, जेयू ४९६६) नाशिकरोड येथील शिवाजी पुतळा चौकाकडून सिन्नर फाट्याच्या दिशेने जात असताना रेल्वे पुलावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. यानंतर चालक ट्रकसह फरार झाला.
अपघातात महामार्गावर पडल्याने देवजी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. सामाजिक कार्यकर्ते जगन गवळी यांनी त्यांना पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच देवजी यांचा मृत्यू झाला होता. नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
अर्धा तास मदत मिळाली नाही
देवजी अपघातानंतर अर्धा तास महामर्गावर जखमी अवस्थेत पडून होते. सुरुवातीला त्यांनी मदतीसाठी याचना करूनही कोणी पुढाकार घेतला नाही. महामार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. अपघाताची माहिती मिळताच जगन गवळी, शुभम छोले यांनी धाव घेत मिळेल त्या वाहनाने जखमीला रुग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत विलंब झाला होता.
जखमी देवजी यांना अपघातानंतर लगेच उपचारांसाठी मदत मिळाली असती, तर त्यांचे प्राण वाचू शकले असते. या अपघातात देवजी यांच्या कपाळात त्यांच्याच मोपेडचा आरसा घुसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. डोक्यातील आरसा काढणेही मुश्कील झाले. अतिरक्तस्राव झाल्याने महामार्गावरच त्यांचा करूण अंत झाला.
नांदेडमध्ये ट्रॅक्टर अपघातात सात ठार
दुसरीकडे, नांदेडपासून १५ किलोमीटरवर असलेल्या आलेगावमध्ये (ता. नांदेड) मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने शुक्रवारी सकाळी सात जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील तीन जणांना वाचविण्यात यश आले. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक फरारी झाला. लिंबगाव पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
वसमत तालुक्यातील गुंज येथील काही मजूर आलेगाव (ता. नांदेड) येथील दगडूजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतातील भूईमूग काढण्यासाठी सकाळी निघाले होते. मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर सकाळी साडेसातला आलेगाव रस्त्यावरील पांदण रस्त्यावरून जात असताना विहिरीत कोसळला. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यात चिखल झाला होता. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर विहिरीत पडला.
अपघाताची माहिती जवळच्या शेतकऱ्यांना समजली. त्यांनी तत्काळ पार्वतीबाई रामा बुरुड (वय ३५), पुरभाबाई संतोष कांबळे (वय ४०) सटवाजी जाधव (वय ५५) या तिघांना वाचवले. या घटनेनंतर पोलिसांसह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.