उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज आता निकषात बसत नसल्याने अपात्र केले जात आहेत. याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची अपडेट सांगितली आहे.
“लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा होता. पण नंतरच्या काळात आपल्याला वेळ कमी पडला. आम्ही जून महिन्यात योजनेची घोषणा केली. आम्ही ऑगस्टमध्ये जुलै-ऑगस्टचे पैसे दिले. सप्टेंबरला त्या महिन्याचे पैसे दिले. ऑक्टोबरला ऑक्टोबर-नोव्हेंबरचे दिले. असे सलग पाच महिने पैसे दिले. ते पैसे देत असताना बारकाईने सर्व नियम तपासायला वेळ मिळायला होता. पण दुर्दैवाने तेवढा वेळ आम्हाला वेळ मिळाला नाही”, असं अजित पवार म्हणाले.
‘अपात्र महिलांकडून पैसे परत घेणार नाही’
“अपात्र ठरलेल्या महिलांकडून मागच्या महिन्यांचे पैसे घेतले जाणार नाहीत. पण ज्या लाडक्या बहीणकडे चारचाकी वाहनं असतील, ज्या लाडक्या बहिणीचं कुटुंबाचं बार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, जी महिला संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार रुपयांचा लाभ दर महिन्याला घेत असेल, आणि लाडकी बहीण योजनेचेही पैसे घेत असेल तर आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे चालू ठेवण्याचा निर्णय घेणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेचे दीड हजार बंद करणार आहोत. लाभ घेताना कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्यावा, अशी शासनाची आधीपासून भूमिका आहे”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
“केंद्र सरकारने 500 रुपये महिना हा आमच्या शेतकऱ्यांना सुरु केला. तशीच योजना राज्य सरकारची योजना आणली. या राज्य आणि केंद्र सरकारच्या दोन वेगळ्या योजना आहेत. केंद्र आणि राज्य सरकार दोघांकडून शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 6 हजार असे एकूण 12 हजार मिळतात. पण राज्याच्या ज्या श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना असेल, लाडकी बहीण किंवा इतर अनेक योजना असतील यापैकी एकच लाभ घ्यावा”, असं अजित पवार यांनी आवाहन केलं.
GBS in Mumbai : पुण्यात थैमान घालणाऱ्या GBS आजाराचा मुंबईत शिरकाव, मुंबईकरांनो काळजी घ्या!
लाभार्थी महिलांची नावे आधारकार्डशी लिंकअपचं काम सुरु
“आम्ही आधारकार्डशी लिंकअप करतोय. त्या आधारावर पुढची कारवाई करतोय. कारण मध्ये तीन बांगलादेशी महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळाल्याची बातमी समोर आली होती. असं कोणतंही प्रकरण समोर येऊ नये म्हणून आम्ही सर्व काळजी घेतोय”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

