• Thu. Jan 23rd, 2025

    चेन खेचली, प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् तितक्यात…; रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम

    चेन खेचली, प्रवासी ट्रेनमधून उतरले अन् तितक्यात…; रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितला घटनाक्रम

    पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांचा पाचोरा येथे अफवेमुळे मृत्यू झाला. जवजवळ ११ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घटनाक्रम सांगितला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जळगाव: लखनऊवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांचा पाचोरा येथे अफवेमुळे मृत्यू झाला. जवजवळ ११ प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो.

    पाचोरा येथे पुष्पक एक्सप्रेस थांबली त्यानंतर चाकांजवळ आगीच्या ढिणग्या उडाल्या. त्यावेळी डब्याला आग लागली असल्याच्या अफवा पसरली आणि अनेक प्रवाशांनी भीतीमुळे ट्रॅकवर उड्या टाकल्या. त्याचवेळी समोरच्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्या प्रवाशांना चिरडले गेले.

    रेल्वे अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम
    पाचोरा येथील रेल्वे दुर्घटनेवर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पुष्पक एक्सप्रेस ही रेल्वे लखनऊपासून मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनलकडे जात असताना दुपारी ४ च्या दरम्यान जळगाववरून पाचोऱ्याच्या जवळ आल्यानंतर या गाडीमध्ये अलार्म चेन पुलिंग झाली. अलार्म चेन पुलिंग झाल्यानंतर प्रवाशी या गाडीतून खाली उतरले होते. त्या दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस जी बंगळूरु वरुन दिल्लीला जाते. या रेल्वेने काही प्रवाशांना धडक दिली. त्यात काही प्रवाशी जखमी झाले.
    स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वैद्यकीय मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आसपासच्या रुग्णालयांच्या रुग्णवाहिका तेथे पोहचल्या आहेत. रेल्वेची मेडिकल व्हॅनही भुसावळ स्थानकातून निघून त्याठिकाणी पोहचणार आहे. ज्या प्रवाशांना वैद्यकीय मदत आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत ती पोहचवली जात आहे.

    मुख्यमंत्र्‍यांची सोशल मीडिया पोस्ट

    परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत मृतांना श्रध्दांजली अर्पण करत तेथे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’ तर ‘माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.’

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed