Pune Crime News : पुण्यातील वाघोलीमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
चहा पिताना जीवघेणा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेजसमोर घडली आहे. नागेश जगताप हा तरुण आपल्या मित्रासोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी जुन्या वादाचा राग मनात धरून मंगेश सांगळे हा आपल्या दोन मित्रांसोबत तेथे आला. सुरुवातीला दोघांमध्ये वादविवाद झाला. ‘तू मला शिवी का दिली?’ असा जाब विचारत आरोपीने अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर इजा झाली. हल्ला इतका भयानक होता की, आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. रक्तबंबाळ अवस्थेत नागेश खाली कोसळला. नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या त्याचा मित्र सिद्धेश यालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे.
Solapur Crime : दुपार झाली तरी दार बंद, शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला तर दाम्पत्याची बॉडी आढळली; PM रिपोर्टमध्ये मोठी माहिती
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तातडीने जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये आरोपी तरुणावर कोयत्याने हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींचा कसून तपास केला. त्यानंतर मुख्य आरोपी मंगेश सांगळे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमकं कारण आणि त्याचे मित्र कोण होते? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, जखमी तरुणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे वाघोली परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
