• Sun. Jun 14th, 2026

    छोटा पॅकेट बडा धमाका! 3 वर्षीय गोजिरीचा अनोखा विक्रम; आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणारी जगातील सर्वात तरुण संशोधक

    छोटा पॅकेट बडा धमाका! 3 वर्षीय गोजिरीचा अनोखा विक्रम; आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणारी जगातील सर्वात तरुण संशोधक

    Youngest International Patent Holder Gojiri Kottawar: गोजिरी मनीषनगर येथील स्मॉल वंडर प्री-स्कूलमध्ये नर्सरीला आहे. या चिमुरडीने विज्ञानाच्या जगात इतिहास रचला आहे.

    नागपूरकर तीनवर्षीय चिमुरडीचा जागतिक विक्रम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साबणाचा फेस तयार करून त्याचे गोल-गोल फुगे (बबल्स) आपण सर्वांनीच आपापल्या लहानपणी उडवले आहेत. बबल्स म्हणजे गोल आकाराचेच, हे समीकरणदेखील आपल्या सर्वांच्याच डोक्यात फिट्ट बसले आहे. पण, नागपूरच्या अवघ्या तीनवर्षीय चिमुरडीने या बबल्सना चक्क त्रिमितीय (थ्रीडी) आणि वेगवेगळ्या भौमितिक आकार प्रदान केला आहे. तिच्या या अनोख्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. असे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणारी जगातील सर्वात तरुण संशोधक होण्याचा अनोखा विक्रम तिने नोंदविला आहे. या वंडर गर्लचे नाव आहे, गोजिरी अजिंक्य कोत्तावार.

    स्वतःच्या नावे आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदवणारी गोजिरी ही जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. लहान मुलांना साबणाचे बबल्स उडवायला खूप आवडतात. मात्र, सहसा हे बबल्स गोल आकाराचेच असतात. गोजिरीच्या या संशोधनामुळे या बबल्सला थ्रीडी स्वरूप प्राप्त झाले आहे. या संशोधनात एक खास आकाराचा बेस तयार करण्यात आला. या बेसच्या साहाय्याने हवेत बबल्स सोडल्यास ते गोल न राहता विज्ञानातील विविध थ्रीडी आकार धारण करतात. २० नोव्हेंबर २०२५ रोजी जर्मनी सरकारने या संशोधनाला अधिकृत पेटंट प्रदान केले. त्यानंतर ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डने गोजिरीची ‘यंगेस्ट इंटरनॅशनल पेटंट होल्डर’म्हणून अधिकृत नोंद केली आहे.
    Maharashtra TimesNagpur News: खेळायला जातो सांगून निघाला, बारावीच्या विद्यार्थ्याने मॉलच्या इमारतीवरुन आयुष्य संपवलं, खिशात उंदीर मारण्याचं औषध
    वडिलांच्या पावलावर पाऊल
    गोजिरीचे हे यश योगायोग नाही, तर तिला संशोधनाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचे वडील डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः नामवंत संशोधक आहेत. त्यांच्या नावावर तब्बल ४८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. शिक्षण आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे ‘फुनसुक वांगडू’ म्हणून ओळखले जाते. पद्मश्री पुरस्कारासाठी देखील त्यांचे नामांकन झाले आहे. यवतमाळ येथे त्यांनी ‘ऊबुंटू’ नावाची प्रयोगशील शाळा सुरू केली असून तिथे मुलांना ‘प्रयोगातून शिक्षण’ दिले जाते.

    Maharashtra TimesNagpur Crime: पाचवीच्या विद्यार्थिनीचे गणित चुकले, शिक्षकाकडून अमानुष मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
    गोजिरीच्या या संशोधनाबाबत सांगताना अजिंक्य कोत्तावार म्हणाले, ‘गोजिरीसोबत खेळत असतानाच या संशोधनाची संकल्पना सुचली. आजची युवा पिढी केवळ नोकरीच्या मागे धावते. पण, त्यांनी संशोधक बनून जगासमोर आदर्श ठेवावा या विचाराने मी हे संशोधन गोजिरीला समर्पित केले. योगायोगाने ती जगातील सर्वात तरुण पेटंटधारक ठरली, याचा अभिमान आहे.’

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा