• Wed. Jan 22nd, 2025
    रात्र वैरीण ठरली, घराकडे निघालेल्या तरुणाचा काळ बनली, अवघ्या वीस वर्षातच तरूणाची प्राणज्योत मालवली

    Nandurbar Accident News : असं म्हणतात की, काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. परंतु अवेळी येणाऱ्या मृत्युसारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बघितलेलंही नाही अशा २० वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाला. हाता-तोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्याने वळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महेश पाटील, नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी-खांडबारा रस्त्यावर खातगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाने गावाकडे परतणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० जानेवारी रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    असं म्हणतात की, काळ आणि वेळ कधी सांगून येत नाही. परंतु अवेळी येणाऱ्या मृत्युसारखी दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बघितलेलंही नाही अशा २० वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाला. हाता-तोंडाशी आलेला घास काळाने हिरावल्याने वळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    काय घडलं नेमकं?

    विसरवाडी खांडबारा-रस्त्यावर खातगाव फाट्याजवळ दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आर्यन पायल्या वळवी (वय २०) रा. तलावीपाडा ता. नवापूर हा युवक दुचाकीने (क्र.एम.एच.३९ ए.एच.७३७०) विसरवाडीहून खांडबाराच्या दिशेने त्याच्या गावी जात होता.खातगाव फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात आर्यन वळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

    आर्यनचा जागीच मृत्यू

    अपघातानंतर विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बोरसे, लिनेश पाडवी, विजय चौधरी, विश्वनाथ नाईक, पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र, तोपर्यत आर्यनचा जागीच मृत्यू झाला होता. मृत आर्यनचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघातात मयत युवकाची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तलावीपाडा येथील नातेवाईकांना कळविले.

    नातेवाईकांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात विनोद चौरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोउनि नरेंद्र वळवी करीत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    महेश पाटील

    लेखकाबद्दलमहेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये नंदुरबार प्रतिनिधी म्हणून कार्यरत. 2003 ते 2014 दरम्यान विविध वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून सुरुवात. त्यानंतर विविध वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून प्रवास करीत मटा ऑनलाईन पर्यंत वाटचाल.राजकीय बातम्यांमध्ये विशेष हातखंडा, विशेष स्टोरी शोधण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed