BJP Nagpur Survey : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले असताना राज्यातील भाजपची संघटना मात्र आगामी आव्हानांसाठी तयारी करताना दिसत आहे.
दरम्यान भाजपने आता सध्याच्या लोकप्रतिनिधींबाबत (नगरसेवक) जनतेचा कल सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत नागपूरच्या सर्व्हेतून अनेक नगरसेवकांचे रिपोर्टकार्ड निगेटिव्ह आले आहेत. अशा स्थितीत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देऊन गुजरात पॅटर्न आजमावण्याची शक्यता आहे, त्यामुळेच शिर्डी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपला मोठ्या विजयाचे लक्ष्य दिले होते.
सेनेचे ३ आमदार पाडायला फिल्डींग लावली! शिंदेंच्या शिलेदाराचे दादांच्या विश्वासू नेत्यावर आरोप
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नुकताच पहिला सर्व्हे केला होता. वृत्तानुसार, या सर्वेक्षणात भाजपच्या ३० ते ४० टक्के नगरसेवकांचे रिपोर्टकार्ड निगेटिव्ह आहेत. या सर्वेक्षणात निगेटिव्ह रिपोर्ट कार्ड असलेल्या नगरसेवकांना डच्चू देणार असल्याचा माहिती असल्याने भाजपच्या अनेक उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीतील चेहरे ठरवण्यापूर्वी भाजप दोन ते तीन सर्वेक्षण आणि सेन्सिंग प्रक्रिया राबवते. यानंतर कोण निवडणूक लढवणार? हे तीन उमेदवारांच्या पॅनेलच्या माध्यमातून ठरवले जाते. तत्पूर्वी नागपुरातील विद्यमान महापौर आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपून खूप महिने लोटले आहेत. महापालिकेचा कारभार प्रशासकांकडून चालवला जात आहे.
नागपूर महानगरपालिकेतील एकूण जागा १५१ आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने १०८ जागा जिंकत महापालिकेवर झेंडा फडकवला. भाजपच्या जागा ४६ने वाढल्या होत्या. काँग्रेसला २९, बसपला १० आणि शिवसेनेला २ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या वाटेला केवळ १ जागा आली. मुंबईनंतर ठाणे, पुणे आणि नागपूर ही महाराष्ट्रातील महत्वाची शहरे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील येथे असल्याने भाजपसाठी हे शहर महत्वाचे आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा बालेकिल्ला आहे. यातच फडणवीसांनी महापौर पदाची धुरा देखील सांभाळली आहे. पहिल्या पाहणीत नगरसेवकांचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर नागपूरच्या या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झाली आहे.