कराड प्रकरणाच्या कनेक्शनमुळे सोलापूर पोलिसांनी सोलापूर कोर्टात सुनावणी केली. २१ जानेवारी रोजी न्यायालय निर्णय देईल. सुशील कराड आणि फिर्यादी पक्षाचे वकिलांनी युक्तिवाद केला आहे. सोलापूर कोर्टाने एमआयडीसी पोलिसांचा अहवाल मागविला होता. तक्रारीत तथ्य नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. या प्रकरणात खाजगी फिर्याद दाखल आहे.
काय आहे प्रकरण-
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या नावे सान्वी ट्रेडर्स आणि त्यांच्या पत्नीच्या नावे अन्वी इंटरप्रायझेस अशा दोन फर्म आहेत. या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने १ कोटी ८ लाख रुपयांचा अपहार केल्याचा सुशील कराड यांनी १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फर्ममधील मॅनेजर फरार आहे. त्याच मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणातील फिर्यादी महिलेचे वकील ऍड सूर्यवंशी यांनी यापूर्वी माहिती देताना सांगितले, सुशील कराड यांनी पीडित महिलेकडून आणि तिच्या पतीकडून जबरदस्तीने गाडया, सोने आणि प्लॉट जागा खरेदीखतान्वये लिहून घेतले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज एमआयडीसी पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केला होता. या सर्व बाबी नमूद करत ऍड विनोद सूर्यवंशी मार्फत पीडित महिलेने सोलापूर कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केली होती.
सुशील कराड यांच्या वकिलांनी माहिती देताना सांगितले-
घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्याने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली. त्याचा तपास परळी, बीड पोलिसांनी केला. त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेचे तकारीत तथ्य नसल्याचे आणि तिने अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली होती. त्यावर सुनावणी झाली असून २१ जानेवारी मंगळवारी सोलापूर कोर्ट निर्णय देतील, अशी माहिती ॲड. संतोष न्हावकर यांनी दिली आहे. यात आरोपीतर्फे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. राहुल रूपनर, ॲड. शैलेश पोटफोडे तर फिर्यादीतर्फे ॲड. विनोद सूर्यवंशी, अॅड. श्रीकांत पवार, ॲड. मधुकर व्हनमाने काम पाहत आहेत.