Nandurbar Mother Kill Children And Died By Suicide: एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा जीव घेऊन स्वत:चंही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नंदुरबार येथे घडली आहे.
सातपुड्याचा दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथील सुभाष वसावे हे काही कामानिमित्त खापर येथे गेले होते. तर, त्यांची तीन मुलं शाळेत गेली होती. यादरम्यान त्यांची पत्नी जेसाबाई सुभाष वसावे (वय ३५) यांनी १९ जानेवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावले. त्यानंतर ती चावी गळ्यात अडकवली. त्यांनंतर त्यांनी दिव्या सुभाष वसावे (वय ४ वर्ष) आणि नरेश सुभाष वसावे ( वय १५ महिने) या दोन चिमुकल्यांना गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी त्यांचे पती सुभाष वसावे हे गावाहून परतल्यानंतर जेव्हा घरी आले. तेव्हा त्यांनी आवाज दिला, मात्र दरवाजा उघडला नाही. तेव्हा जवळच्या लोकांना बोलावलं. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर दरवाजा उघडल्यावर ही घटना उघड झाली. तेथे पंचनामा करून तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षभरापूर्वी केला होता आत्महत्येचा प्रयत्न
अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथील जेसाबाई सुभाष वसावे यांची गेल्या पाच वर्षापासून मानसिक स्थिती बिघडली होती. त्यांनी मागील वर्षी विष प्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता. मात्र यावेळी वेळीस उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचवण्यात यश आले होते. मात्र रविवारी त्यांनी दोन मुलांना गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सुभाष रामा वसावे रा. कुवा ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यांनी याबाबत मोलगी पोलीस स्टेशनला खबर दिली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गाडीलोहार हे पुढील तपास करत आहेत.