Guardian Ministers of Maharashtra States : राज्यातील ३६ जिल्ह्यांचे कारभारी म्हणजेच पालकमंत्री कोण असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आज अखेर पालकमंत्री जाहीर झाले आहेत. यामध्ये देखील मंत्रीपद खातेवाटपाप्रमाणेच चार लाडक्या बहिणींना स्थान मिळाले आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. अदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा असणार आहे. तर माधुरी मिसाळ कोल्हापुरच्या सहपालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. तर मेघना बोर्डिकर यांच्याकडे परभणीचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले.
पंकजा मुंडे या पर्यावरण खात्याच्या मंत्री असून त्यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे. पण धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्येप्रकरणी गंभीर आरोप करण्यात येत असल्याने बीडच्या पालकमंत्रीपदावरुन पत्ता कट झाला आहे. यामध्येच पंकजा मुंडेंनाही बीडच्या पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. एकाचवेळी मुंडे बहीण-भावांना बीडचे पालकत्व नाकारण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन देखील अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाले. भरत गोगावले याआधी अनेकदा पालकमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली होती. मंत्रीमंडळात त्यांच्याकडे रोजगार हमी हे खाते असून त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रायगडचे पालकमंत्रीपद पुन्हा अदिती तटकरेंकडे सोपवण्यात आले आहे. आता जिल्ह्याचे राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.