Good News for Soyabean Farmer: राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी फोनवर चर्चा करुन सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. याला आता कृषीमंत्र्यांनी हिरवा कंदिल दिला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना लाभदायी
ठरणार आहे. याआधी केवळ १३ जानेवारीपर्यंतच खरेदीची मुदत असल्याने सोयाबीन उत्पादन पेचात पडले होते. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनची मोठी विक्री बाकी आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच सोयाबीनच्या विक्रीवर शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव देखील मिळणार असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे केंद्रीय कृषीमंत्र्यांशी संवाद साधून सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत तातडीने कृषीमंत्री चौहान यांनी मुदतवाढ दिली आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.
दरवर्षी पणन विभागामार्फत नोव्हेंबर महिन्यापासून सोयाबीनची खरेदी सुरु केली जाते. या खरेदी कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पणन विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत पणन विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तर सोयाबीन खरेदी सुलभरित्या होण्यासाठी राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी पुढील वर्षापासून ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत. तर शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्येच पूर्ण करावी, असेही फडणवीस म्हणाले.