Navi Mumbai : मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
या मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ जानेवारीपासून सुरू झाला आहे. हा सोहळा १५ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होईपर्यंत सुरू राहणार आहे. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी एक आठवड्याचा विशेष धार्मिक कार्यक्रम आणि यज्ञविधी पार पाडला जात आहे. मंदिराचे विश्वस्त आणि मुख्य, डॉक्टर सूरदास प्रभू यांनी सांगितले की, या मंदिराच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी सांस्कृतिक केंद्र आणि वैदिक संग्रहालयाची पायाभरणीही करतील.
श्रील प्रभूपाद यांचे स्मारक असेलेले पहिले मंदिर
खारघर, नवी मुंबई, सेक्टर २३ मध्ये स्थित, हे मंदिर बांधण्यासाठी एकूण १२ वर्षे लागली. पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे. पीएम मोदींनी यापूर्वी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी या मंदिराला भेट दिली होती. या मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत २०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. मंदिराचा गाभा भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजक 3D चित्रांनी सजलेला आहे. ज्याचे उद्घाटन १५ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. ज्यांवर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरलेल्या आहेत. ग्लोरी ऑफ महाराष्ट्र प्रकल्पाअंतर्गत हे मंदिर बांधण्यात आले आहे. इस्कॉन मंदिराचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या तीन मूर्ती, देश-विदेशातील त्यांच्या अनुयायांच्या मूर्ती, त्यांची छायाचित्रे आणि त्यांची पुस्तके यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. इस्कॉनची जगभरात सुमारे ८०० मंदिरे आहेत. परंतु नवी मुंबईतील हे मंदिर एकमेव असे मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभूपाद यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.
या मंदिरात तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.
“येथे लोक केवळ देवाची भक्ती आणि आश्रय मिळविण्यासाठीच येणार नाहीत तर, त्यांच्या अस्वस्थ मनांना शांत करण्यासाठी आधार घेतील. बांगलादेशातील इस्कॉन मंदिरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो.” असे सूरदास महाराज म्हणाले. यावेळी भारत सरकारच्या बांगलादेशबाबतच्या धोरणांचेही त्यांनी समर्थन केले.