Ajit Pawar Supriy Sule Video : उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे बारामतीतील कार्यक्रमात पहिल्यांदाच एकत्र आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणाबाबत केलेली नाराजी असूनही सुप्रिया सुळे वेळेवर कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. या निमित्ताने पवार कुटुंबीयांमधील राजकीय तणाव कमी झाला असल्याचे दिसून आले.
अर्थात या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री व ऊर्जा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्पष्ट केली. या भागाची लोकप्रतिनिधी असल्याने किमान 24 तास आधी निमंत्रण मिळायला हवे. आमचेही पूर्वनियोजित कार्यक्रम असतात. अशा वेळी सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी एखादा कार्यक्रम आयोजित करताना किमान 24 तास आधी कळवणे अत्यावश्यक आहे याची नोंद घेण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान या नाराजी नंतर ही सुप्रिया सुळे या अंजनगाव मध्ये पोहोचल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अगोदर त्या अंजनगाव मध्ये पोहोचून अजितदादांची प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. त्यानंतर हा उद्घाटन सोहळा दोघांच्याही उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच बारामतीत एकत्र कार्यक्रमात दिसून आले.
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली होती. सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता. पवार कुटुंबामध्ये पहिल्यांदाच हा सामना पाहायला मिळाला. त्यानंतर अजित पवारांना बारामतीकरांनी भरभरून मतांनी विजय मिळवून दिला होता. युगेंद्र पवार आणि अजितदादा अशी काका पुतण्यामध्ये लढत पाहायला मिळाली होती. मात्र बारामतीकरांनी दादांवर मतांचा पाऊस पाडत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांनी राज्यभर आपल्या सभांचा धडाका सुरू ठेवला होता. त्यानंतर विधानसभेलाही पवार मैदानात उतरले पण लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं होतं.