• Fri. Mar 20th, 2026

    Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याने विधानसभेत गोंधळ, सत्ताधाऱ्यांची निलंबनाची मागणी

    Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याने विधानसभेत गोंधळ, सत्ताधाऱ्यांची निलंबनाची मागणी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज धर्म स्वातंत्र्य विधेयकावर भाष्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेच्या सभागृहात भाषण करताना केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेच्या सभागृहात सादर केलं. यानंतर या विधेयकावर सभागृहात चर्चा करण्यात येत होती. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ उडाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जितेंद्र आव्हाड यांना माफी मागण्याचे आदेश दिले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रचंड आक्रमक झाले. मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली.

    मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

    जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाबाबत एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. जितेंद्र आव्हाड जो उल्लेख केला ते आपण पहिल्यांदा ऐकतोय. त्यांचा उल्लेख सभागृहाच्या कामकाजातून तातडीने काढून टाका, अशी मागणी शंभुराज देसाई यांनी केली. यावेळी तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी इतिहासावर वाद न घालता विधेयकावर बोला, असे आदेश जितेंद्र आव्हाड यांना दिले.

    मंत्री दादा भुसे देखील आक्रमक

    “जितेंद्र आव्हाड यांनी भावना व्यक्त करत असताना त्यांनी भारताचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केलेला आहे. महाराष्ट्रात हे बिलकूल चालणार नाही. त्यांना कुणाचं लांगूलचालन करायचं असेल तर ते त्यांना लखलाभ. प्रत्येक समाजात अनेक चांगल्या आणि वाईट प्रवृत्या काही काळापूर्वी होत्या. पण त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता काही समाजात दहा-दहा पत्नी केल्या जातात. त्यावर ते बोलत नाहीत. त्यावर ते भाष्य करत नाहीत. हे संविधानात लिहिलेलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कुणी परवाना दिला आहे? जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे”, अशी मागणी मंत्री दादा भुसे यांनी केली.

    विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?

    “या सभागृहात कामकाज करत असताना कोणत्याही सदस्यासाठी सर्वात दुर्दैवी गोष्ट असते जर आपण केलेल्या शब्दांना रेकॉर्डवरुन काढून घेतलं त्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त दुखद कोणती गोष्ट असू शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त करावी. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो उल्लेख केला त्याबाबत मी जितेंद्र आव्हाड यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करुन माफी मागण्याचे निर्देश देतो”, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा