• Thu. Jun 18th, 2026
    Sagar Moholkar Death : पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू; गुंड निलेश घायवळ कनेक्शनचा तपास, जामखेड गोळीबार प्रकरणाला नवे वळण

    पैलवान सागर मोहळकर याच्यावर 9 मार्चला जामखेडमध्ये गोळीबार करण्यात आला होता. सागर मोहळकरला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून गुंड निलेश घायवळ कनेक्शनचा तपास केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : जामखेड येथे ९ मार्च रोजी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकर याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि मोहोळकर याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे पुन्हा एकदा परिसरात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात ९ मार्च रोजी सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

    या प्रकरणाचा तपास करताना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी पुण्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या गोळीबारामागे कोणाचा हात आहे आणि नेमका वाद कशामुळे झाला? याचा शोध पोलीस घेत आहेत.

    तपासादरम्यान काही धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि ‘चिन्या’ नावाने ओळखला जाणारा आरोपी यांची नावे पुढे आली आहेत. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

    दरम्यान, सागर मोहोळकर हा काही दिवसांपासून चर्चेत आला होता. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान त्याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना घडल्याचे सांगितले जाते. त्या घटनेनंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, अशी चर्चा होती. त्यामुळे या गोळीबारामागे निलेश घायवळ याचे काही कनेक्शन आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. मोहोळकरवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर केला जात असून या हल्ल्यामागील नेमका सूत्रधार कोण? हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा