Ajit Pawar on Walmik Karadn Photo Controversy : संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडांना घेरले जात असून धनंजय मुंडेंनाही लक्ष्य केले जात आहे. सुरेश धस यांच्यासह अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर बीडमधील गुन्हेगारीवरुन दमानियांनी आतापर्यंत अनेक फोटो ट्विट करुन धनंजय मुंडेंसह सरकारवरही आरोप केले आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले, अलीकडे नेत्यांना भेटण्यासाठी अभ्यागतांची गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो, फोटो काढून नाय दिला तरी नाराज होतात, अन् गडी बदलला असे म्हणतात आणि अशातच एखादा नवीन गडी येतो त्याच्यासोबत फोटो काढला तर वाटच लागते. बातम्या पाहतो तर तेच याचा फोटो त्याचा फोटो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतंय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी, असा मिश्कील सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
यावेळी अजित पवारांनी वाल्मीक कराड यांच्या राजकीय नेत्यांच्या सोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं आहे. सध्या राजकारण काय चाललं आहे ते पहा सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो त्यामुळे सगळं आक्रीतच घडत आहेे. त्यामुळे यदा कदाचित कोणाचा चुकीचा फोटो माझ्यासोबत आला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे असं मी सांगेल. आणि आम्ही पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत, दोन नंबर वाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा.’ असे म्हणत अजित पवारांनी फोटो प्रकरणावरून कार्यकर्त्यांना सल्ला दिला. तर आम्हाला मोठी किंमत देखील मोजावी लागते, असे देखील दादांनी नमूद केले.