Nagpur Crime News : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तुळजाई नगरमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.
मृत महिलेचे नाव राखी पाटील (27 वर्षे) असून तिचा पती सूरज पाटील हा पेंटिंगचे काम करतो. तर राखी गृहिणी होत्या. त्यांना दोन मुलं आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरज आणि राखी यांनी तुळजाईनगर येथील नीलेश दधे यांच्या घरात भाड्याने खोली घेतली होती. गुरूवारी दुपारी दोघांमध्ये वाद होऊन सूरजने राखीच्या डोक्यावर जड वस्तूने वार करून तिची हत्या केली.
हत्येला अपघाताचे स्वरुप देण्यासाठी त्याने पत्नीला वैद्यकीय रुग्णालयात नेले आणि त्याची पत्नी ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली आणि त्यामुळेच तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचे भासवले. तिला त्याने त्याच अवस्थेत रुग्णालयात नेले. त्याने त्याची पत्नी छतावरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. त्यानंतर राखीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तिथे त्यांना घरभर रक्त पसरलेले दिसले. मात्र, पत्नीच्या मृत्यूनंतर तो रुग्णालयातून गायब झाला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस सक्रिय झाले. पोलिसांना संपूर्ण प्रकरण समजायला वेळ लागला नाही. कारण डॉक्टरांना दिलेली माहिती आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती पूर्णपणे वेगळी होती. तोपर्यंत सूरज आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाला होता. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा नियोजनबद्ध पद्धतीने मेडिकल हॉस्पिटलच्या आवारातून अटक केली आहे.
तपासात असेही समोर आले की, राखी दीड महिन्यांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती आणि काही दिवसांपूर्वीच ती परत आली होती, त्यामुळे तिच्या पतीला तिच्या चरित्रावर संशय होता. घटनेच्या दिवशी सुरजने राखीला फोनवर कोणाशी तरी बोलत असताना पकडले आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली.