Sangli Fire News: सांगलीत एका फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली, घरात साठवून ठेवलेल्या फटाक्यांना अचानक आग लागली आणि एकामागे एक भीषण स्फोट झाले. या घटनेत एका वृद्धेचा होरपळून मृत्यू झाला आहे.
आगीत गंभीर जखमी झालेल्या कलावती शिवदास तारळकर (वय ७२) या वृध्देचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तात्रय शिवदास तारळकर (वय ५६), त्यांची पत्नी वर्षा दत्तात्रय तारळकर (वय ५२), मुलगी दिपाली दत्तात्रय तारळकर (वय २८), याेगिता शंकर पवार, मानसी शंकर पवार आणि कल्पना विजय जाधव असे एकूण अन्य सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची विटा पाेलीस ठाण्यात नाेंद झालेली आहे. यशवंतनगरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी फटाक्यांच्या गाेडाऊनला लागलेल्या भीषण आगीमुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय तारळकर यांचे यशवंतनगरमध्ये साई कापड दुकानासमाेर स्वत:च्या राहत्या बंगल्यात कार्तिक हाेलसेल फटाके विक्रीचे दुकान आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून ते फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, आज बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळे घरातील गाेडाऊनमध्ये असलेल्या फटाक्यांच्या स्टाॅकने पेट घेतला. फटाके हे ज्वलंनशील असल्याने बघता – बघता गाेडाऊनमधील सर्व फटाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे फटाक्यांचा स्फोट हाेऊन भीषण आग लागली. क्षणार्धात लागलेल्या आगीने राैद्ररूप धारण केले.
गाेडाऊनमधील सर्व फटाक्यांचा माल जळून खाक झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विटा नगरपालिकेचा अग्नीशमन बंब व पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाला. मात्र, बंगल्याच्या पाठीमागे असलेेल्या गाेडाऊनकडे जाण्यासाठी दाेन्ही बाजूस अरूंद बाेळ असल्याने आग विझवण्यात अडथळा निर्माण झाला हाेता. प्रसंगावधान राखत काही जागरूक व धाडसी युवकांच्या मदतीने नगरपालिकेचा अग्नीशमन पथकाने ही आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु फटाके पेटतच हाेते. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटाेक्यात आणण्यात यश आले. परंतु गाेडाऊनमधील फटाके जळून भस्मसात झाले हाेते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पाेलीस अधिकारी विपुल पाटील, पाेलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे पाेलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पंचनामा सुरू केला.
या भीषण आगीत कलावती शिवदास तारळकर (वय ७२) या गंभीर जखमी झाल्या हाेत्या. त्यांचा विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दत्तात्रय शिवदास तारळकर (वय ५६), त्यांची पत्नी वर्षा दत्तात्रय तारळकर (वय ५२), मुलगी दिपाली दत्तात्रय तारळकर (वय २८), याेगिता शंकर पवार, मानसी शंकर पवार व कल्पना विजय जाधव असे एकूण अन्य सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर विटा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विटा ग्रामीण रूग्णालयाचे डाॅ. रजपूत यांनी विटा पाेलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.