Beed Sarpanch Kidnaping: बीडच्या मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत असताना आता बीडमध्ये पुन्हा एकदा एका माजी सरपंचाचं अपहरण झाल्याची माहिती आहे.
ज्ञानेश्वर इंगळे हे कळमअंबा येथील माजी सरपंच आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन, तीन दिवसांपासून दत्ता तांदळे हा कारेगाव येथील माजी सरपंच आपल्याला पंकजाताईंना भेटून २० लाखांचा निधी आणायचा आहे. त्यासाठी मुंबईला चलण्याचा आग्रह करत होता. १० टक्के कमीशन देऊन हा निधी आणायचा असे तो सांगत होता. बुधवारी मुंबईला जाण्याचे नियोजन ठरले होते. पहाटे पाच वाजता इंगळे हे केज येथील कळंब चौकात आले होते. तिथून ते दत्ता तांदळे याच्या कारमध्ये बसले.
१० टक्के कमीशन देण्यासाठी त्यांनी सोबत २ लाख ६० हजार रुपये घेतले होते. केजहून निघून ते सकाळी ७ वाजता पाटोदा शहरात आले. इथे आल्यावर तांदळे याने इंगळेंना शहराबाहेर असलेल्या एका खोलीत नेले. तिथे आधीच दोघे हजर होते. तिघांनी इंगळे यांना मारहाण केली. त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. त्यांचा मोबाईल काढून घेतला. फोन पे चा पासवर्ड विचारला. फोन पे वर त्यांचे ५० हजार रुपये होते.
त्यानंतर त्यांनी इंगळे यांचा डावा हात डाव्या पायाला दोरीने बांधला आणि पायात बेडीसारखी लोखंडी पट्टी टाकून त्याला कुलूप लावले. त्यांनी सुटका करुन घेत थेट बीडचे एसपी कार्यालय गाठून अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची भेट घेतली. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हानोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.