Prajakta Mali: तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. पण त्यासाठी आम्हाला बदनाम का करता? तिकडे पुरुष कलाकारदेखील होते. मग नावं केवळ महिला कलाकारांचीच का घेतली जातात? असे प्रश्न प्राजक्तानं विचारले.
‘गेल्या दीड महिन्यापासून मी सगळा प्रकार पाहतेय. या कालावधीत मी ट्रोलिंगला, आक्षेपार्ह कमेंट्सचा सामना केला. मी शांत राहिले. पण शांतता म्हणजे मूकसंमती नव्हे. माझी शांतता ही हतबलतेमधून आली आहे. एक व्यक्ती माझ्याबद्दल काहीतरी बरळते. त्याचे हजारो व्हिडीओ तयार होतात. एक बोलल्यावर दुसरा बोलतो. मग पुन्हा पहिला त्याला उत्तर देतो. ही चिखलफेक सुरु आहेत. त्यातून महिलांची अब्रू निघते. राजकारणासाठी अशा प्रकारे महिलांची बदनामी कशासाठी करता?’ असा सवाल प्राजक्तानं उपस्थित केला.
गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, शांत राहणं माझी हतबलता: प्राजक्ता माळी
‘बीडमध्ये आयोजित कार्यक्रमाला मी एकदा गेले होते. मी धनंजय मुंडे यांच्याकडून सत्कार स्वीकारला. तीच आमची एकमेव भेट आहे. त्याच सत्कार सोहळ्याचा फोटो दाखवून विविध प्रकारच्या आवया उठवल्या गेल्या. मी आधी त्याकडे दुर्लक्ष केलं. शांत राहिले. माझं कुटुंब, मित्र परिवार, सहकारी माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्यापैकी कोणीही माझ्या चारित्र्यावर शंका गेतली नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पण माध्यमांसमोर येऊन मला अशाप्रकारे माझी बाजी मांडावी लागतेय हेच दुर्दैवी आहे,’ अशा शब्दांत प्राजक्तानं हतबलता व्यक्त केली.
‘आमदार सुरेश धस यांनी माझ्याबद्दल अतिशय कुत्सितपणे विधान केलं. समोर हशा पिकावा यासाठी त्यांनी माझ्या नावाचा वापर केला. ते कोणत्या हेतूनं माझ्याबद्दल बोलले ते न कळायला मी आणि महाराष्ट्राची जनता दूधखुळी नाही. सुरेश धस यांनी माझी माफी मागावी. त्यांची तक्रार मी महिला आयोगाकडे केलेली आहे. त्यांनी माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल. मी आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन देणार आहे,’ असं प्राजक्तानं सांगितलं.
प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंधाना; ‘कार्यक्रम’ सांगत सुरेश धस यांचा ‘आकां’वर निशाणा
‘तुम्ही ज्यावेळी अशाप्रकारे एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर शंका घेता, तेव्हा नकळत तुम्ही तिच्या प्रतिभेवर, कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित करत असतात. पुरुष कलाकारदेखील राजकारण्यांच्या कार्यक्रमांना जात असतात. आता ज्या कार्यक्रमाबद्दल बोललं जातंय, जिथला फोटो शेअर होतोय, त्या कार्यक्रमाला माझे सहकलाकार प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, आमीर हडकरदेखील उपस्थित होते. पण महिला कलाकारांनाच लक्ष्य केलं जातं. त्यांचीच बदनामी केली जाते,’ अशा शब्दांत प्राजक्तानं घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.