• Sun. Dec 29th, 2024

    पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 28, 2024
    पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला – महासंवाद

    • महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करुन स्थानिक विकासाला चालना द्यावी -मंत्री शंभूराज देसाई यांची आढावा बैठकीत सूचना
    •  एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार
    • माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणार

    मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून आपल्या गड-किल्ल्यांनी ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा जपला आहे. महाराष्ट्राचा हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. त्यातून स्थानिक विकासालाही चालना देण्यात यावी, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

    मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण  विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत  तीनही विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर, माजी सैनिक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, पर्यटन संचालक डॉ. व्ही.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक श्री.कडू,  माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे, माजी सैनिक कल्याणचे संचालक कर्नल दिपक ढोंगे, मेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा आदी अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी  योग्य नियोजन व नवीन नियमावली तयार करुन पर्यटन विभागाची कामे  मार्गी लावण्यात यावीत. प्रचार व प्रसिद्धीसाठी पर्यटन विभागाचे ब्रॅण्डींग करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

    पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिकचा विकास करावा

    पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्याला विकासित करावे. श्री रामांचा जन्म जरी अयोध्येत झाला असला तरी श्री रामांचा बराचसा काळ नाशिकमध्ये गेल्याचा इतिहास आहे. केंद्रीय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला ‘राम-काळ-पथ’ योजनेसाठी निधी मंजूर झाला असून त्यामाध्यमातून रामाचा इतिहास सांगणारे थीम पार्क तयार करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या.  पर्यटन धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन विषयक योजना, पदांचा सविस्तर आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.

    खनिकर्म विभागाचा आढावा घेत असताना मंत्री श्री. देसाई म्हणाले की, खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुलभ होण्यासाठी ‘एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली’ राबविण्यात यावी, जेणेकरुन अवैध खनिज वाहतुकीला आळा बसून महसूल वाढीस चालना मिळेल.

    राज्यातील वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व त्यांच्यावर  अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे कल्याण व पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. तसेच सैनिक कल्याण विभागात कंत्राटी मनुष्यबळ भरताना आजी व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या. तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळांतर्गत (मेस्को) माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करुन देताना सुरक्षा रक्षकांबरोबरच लिपिक, तांत्रिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी यावेळी सूचविले. तसेच त्यांनी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर व मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला.

     

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed