• Fri. Dec 27th, 2024

    तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

    ByMH LIVE NEWS

    Dec 19, 2024
    तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

    • विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड
    • एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र

    नागपूर, दि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

    राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले.  मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.

    अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन

    मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडकं सरकार झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझे धोरण गतिमान विकास हेच होते तिथे पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही.

    विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार

    मागील अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

    विदर्भ विकासासाठी ठोस पावले

    उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, माझे विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. मागील दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. समृध्दी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे.

    विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. मागील अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले.

    अग्रेसर महाराष्ट्र…

    मागील अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या. विक्रमी विकासकामे झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारे पहिले राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे पहिले राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारे पहिले राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारे पहिले राज्य आणि सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेले राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची काम

    महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करत आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत.  मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनेच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचे राज्य करायचे आहे.  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचे एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचे. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed