Amol Mitkari Commented on Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांनी काव्यात्मक प्रतिक्रिया दिली. यावर अमोल मिटकरींनीही मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरींनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘भुजबळ काही नाराज नाहीत, चुकीची बातमी चालवली जात आहे. भुजबळ म्हणत असतील जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, तर सोबतच त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की, ‘तेरे बिना दिल नहीं लगता.’
मिटकरी पुढे म्हणाले, ‘भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहेत. त्यामुळे आत्मा कधी शरीर सोडून जात नसतो.’ तसेच मिटकरींनी भुजबळांना मंत्रिपद न देण्याचा दुसरा पर्याय सांगितला आहे. ‘भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही याचा अर्थ असा की, अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजित पवार कुणावर अन्याय करत नाहीत,’ असे मिटकरींनी नमूद केले.
राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा संधी दिली नाही – भुजबळ
माध्यमांनी छगन भुजबळांना पुढच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”. ते असेही म्हणाले की, मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही येवल्यातून लढलंच पाहिजे. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. येवला-लासलगावातील मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. तुमच्या सल्ल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली. पण राज्यसभेसाठी मी आता आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. मला ज्यांनी प्रेम दिलं त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही. तर मंत्रिपद कितीवेळा आलं आणि गेलं पण छगन भुजबळ संपला नाही, असेहा भुजबळांनी नमूद केले.