• Fri. Dec 27th, 2024
    ईव्हीएम मशीनला दोष देणे हा पोरकटपणा; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

    Lipi | Updated: 14 Dec 2024, 7:53 pm

    Ramdas Athawale: ईव्हीएम मशीनला दोष देणे हा पोरकटपणा असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ईव्हीए हे मोदींनी नाही तर काँग्रेसच्या काळात आणल्याची आठवण त्यांनी करून दिली.

    Lipi

    परभणी (धनाजी चव्हाण): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड अपयश मिळाले आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनला दोष देण्यास सुरुवात झाली. मुळात EVM हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले नसून काँग्रेसच्या काळातच त्याची सुरुवात झाली आहे. ज्या ज्या वेळेस काँग्रेसला चांगले यश मिळते त्यावेळेस मात्र ईव्हीएम मशीन वर शंका व्यक्त केली जात नाही, लोकसभेला काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले; त्यावेळेस ईव्हीएम विषयी काँग्रेसने कधीच शंका व्यक्त केली नाही. पण हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये सपाटून पराभव झाल्यानंतर मात्र आता ईव्हीएमला दोष देण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणी योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या ईव्हीएम विरोधी मोहिमेला विरोध करावा. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देणे हा पोरकटपणा असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

    10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान आंबेडकरी अनुयायांकडून शहरात तोडफोड झाली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी लाठी चार्ज केला होता.याची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले परभणी दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली.

    पुढे बोलताना मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आंबेडकरी जनता ही संविधानावर प्रचंड प्रेम करते. संविधानाचा अपमान झाल्यानंतर ती रस्त्यावर उतरून निषेध करणारच. या निषेध दरम्यान पोलिसांनी जो लाठी चार्ज केला त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निरपराध नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे देखील वापस घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज नव्हती ते मी थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते असेही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे अशी ही मागणी केली असल्याचे ते म्हणाले.

    राज्यात एक मंत्रीपद व एक विधान परिषद मिळेल ही अपेक्षा

    आज उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. रिपब्लिकन पक्षामुळे महायुतीमध्ये बॅलन्स आहे. महायुती मधला सर्वात अगोदरचा घटक पक्ष हा रिपब्लिकन पक्ष आहे. लोकसभेला आम्हाला जागा मिळाली नाही विधानसभेला दोन जागा मिळाल्या पण उमेदवार भाजपचाच राहिला त्यामुळे आता राज्यात होणाऱ्या मंत्री पदांच्या शपथविधीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळावे त्याचबरोबर एक विधान परिषदेची जागा मिळावी अशी अपेक्षा मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

    शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर चांगलेच

    मी वेळोवेळी जेष्ठ नेते शरद पवार यांना आग्रह करीत आलेलो आहे की आपण नरेंद्र मोदी सोबत महायुतीमध्ये सहभागी व्हावे आणि देशाच्या विकासात हातभार लावावा. आता अजित पवार तर आमच्या सोबतच आहेत पण आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले तर महायुतीची ताकद वाढेल आणि देशाच्या विकासात भर पडेल हे दोघे एकत्र आलेले चांगले राहील असेही मंत्री रामदास आठवले म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed