Ashish Shelar on Eknath Shinde: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर मोठा आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकारण आता चांगलेच तापले आहे.
महानगरपालिका निवडणुकीआधीच आशिष शेलार यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या कार्यकाळात ६,000 कोटी रुपयांच्या रस्ते सिमेंटीकरण प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप करत त्याबाबतीत चौकशीची मागणी केली आहे .
काय लिहिलंय पत्रात?
पत्रात त्यांनि लिहिले की, “मुंबईत गेल्या वर्षीपासून सुरू झालेली ६,००० कोटी रुपयांची रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटची कामे आणि सध्या सुरू असलेल्या छोट्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांसंदर्भात मी आपणांस लिहित आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघातील सांताक्रूझ पश्चिम भागात बुधवारी रस्त्याच्या पाहणीदरम्यान मला असे आढळून आले की, नुकत्याच बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांना भेगा पडल्या असून सध्या सुरू झालेली रस्त्यांची कामेही नीट होत नाहीत”.
आशिष शेलार यांची चौकशीची मागणी
आशिष शेलार यांनी पुढे लिहिले की, “रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाचे काम आणि काँक्रिटीकरणाच्या खराब कामांच्या अनेक तक्रारींनंतर, मी एक विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे. ते पथक कामाच्या गुणवत्तेच्या बाबींची चौकशी करेल. ज्याचे तपशीलवार लेखापरीक्षण केले जाईल. काँक्रिटीकरण केलेल्या ४० टक्के रस्त्यांच्या पॅचचे आयटी बॉम्बे, व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांसोबत विस्तृत ऑडिट केले पाहिजे.
चौकशीच्या आधारे दोषींवर योग्य कारवाई
“गुणवत्ता नियंत्रण, दक्षता प्रक्रिया आणि कंत्राटदाराच्या कामातील त्रुटींची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशीच्या आधारे, चुकीच्या रस्ते कंत्राटदारांवर दंड आणि बेजबाबदार संस्था, तसेच अधिकारी यांच्यावर त्यांना काळ्या यादीत टाकण्यासह कठोर कारवाई करण्यात यावी”.