Hingoli News : कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना रुग्णालयात बेडची व्यवस्था नसल्याने जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्याची व्यवस्था करण्यात आल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघड झाला असून रुग्णांचे नातेवाईक प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना रुग्णालयात बेडची व्यवस्था नसल्याने जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्याची व्यवस्था करण्यात आल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघड झाला असून रुग्णांचे नातेवाईक प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत. रुग्णालयात ४३ महिलांची शस्त्रक्रिया केल्याच्या नंतर महिलांना जमिनीवर झोपवण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
काय आहे नेमकं कारण?
आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये एकूण तीस बेड ची व्यवस्था आहे. यामध्ये महिलांवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी दहा बेड हे राखून ठेवले जातात. आणि उर्वरित दहा बेड इतर रुग्णांसाठी वापरले जातात या रुग्णालयाच्या परिसरातील ५० ते ५२ गावातील रुग्ण उपचारासाठी व कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी येतात. सध्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी महिलावर्ग मोठी गर्दी करत आहे. त्यामुळे या रुग्णालयात 43 महिलांवर कुटुंब नियोजन बिन टाका पद्धतीने हिंगोलीच्या तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया केल्यानंतर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना बेडची उपलब्धता नसल्याने शस्त्रक्रिया झाल्यावर जमिनीवरच गाद्या टाकून झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
चुक कोणाची?
गेले काही दिवस दडी मारलेल्या थंडीने आठवडाभरापासून जिल्ह्यामध्ये कडाका वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे थंड वातावरण निर्माण झालं आहे आणि यातच शस्त्रक्रिया केलेल्या महिलांवर जमिनीवर झोपायची व्यवस्था केल्याने रूग्णांच्या नातेवाईकांचा आरोग्य विभाग प्रशासनावर प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
गुरुवारी (१२)डिसेंबर रोजी ४३ महिला, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या होत्या व त्यानंतर शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी या ४३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सदर प्रकरणात आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क मात्र होऊ शकलेला नाही.