Palghar News : वाडा- भिवंडी महामार्गावर शिरीषपाडा नजीक या महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची माहिती गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्यानंतर बाळ व माता या दोघांना पुन्हा वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आब्जे गावात राहणारी कल्याणी कैलास भोये ही महिला गर्भवती असल्याने तिला प्रसुतीसाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय समस्या असल्याचे सांगत महिलेला ठाणे येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर ‘१०८’ रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला ठाणे येथे घेऊन जात असतानाच रस्त्यातच या महिलेची प्रसुती झाली आहे. वाडा- भिवंडी महामार्गावर शिरीषपाडा नजीक या महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याची माहिती गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली आहे. महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्यानंतर बाळ व माता या दोघांना पुन्हा वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या बाळ आणि माता दोघेही वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
महामार्गाच्या दुरावस्थेमुळे स्थानिकांचे हाल
वाडा- भिवंडी महामार्गाची दुरावस्था झाली असून महामार्गावरून प्रवास करणारे रुग्ण, प्रवासी, वाहन चालक यांना महामार्गावरून ठाणे, भिवंडी येथे जाण्यासाठी मोठी कसरत करत जाताना त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात देखील होत आहेत. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे रुग्णांना लवकरात लवकर इतरत्र पोहोचणे देखील जिकरीचे बनले आहे. महामार्गाच्या दुरावस्थेतबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
रस्त्यातच प्रसूती झाल्याने पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. वैद्यकीय समस्यांचे कारण देऊन प्रसुतीसाठी इतरत्र रेफर करणे व महिलेची वाटेतच रुग्णवाहिकेत प्रसूती होणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही रुग्णालयाचे विस्तारीकरण रखडले आहे. गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.