• Sat. Dec 28th, 2024

    सावधान! हे तुमच्यासोबतही घडू शकतं;५८ वर्षीय अधिकाऱ्याला सात दिवस ‘डिजीटल अरेस्ट’, १.०७ कोटींचा गंडा

    सावधान! हे तुमच्यासोबतही घडू शकतं;५८ वर्षीय अधिकाऱ्याला सात दिवस ‘डिजीटल अरेस्ट’, १.०७ कोटींचा गंडा

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Dec 2024, 6:26 pm

    Mumbai Crime : एफआयआरनुसार, पवार याने तक्रारदाराला सांगितले की, त्यांच्या आधार कार्डच्या माहितीचा वापर करून एक बँक खाते उघडण्यात आले आणि त्यात ६८ दशलक्ष रुपये जमा करण्यात आले. ही रक्कम एका टोळीने देहविक्री, अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगमधून मिळवून तक्रारदाराच्या नावावर खात्यात जमा केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : एका खासगी कंपनीच्या ५८ वर्षीय मुख्य माहिती अधिकाऱ्याची (CIO) सायबर गुंडांनी १.०७ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पाच पाकिस्तानी पासपोर्ट, तीन बँक क्रेडिट कार्ड आणि १४० ग्रॅम अंमली पदार्थ असलेले एक पार्सल थायलंडला पाठवण्यासाठी त्याच्या आधार तपशीलाचा वापर करण्यात आल्याची धमकी देऊन आपण दिल्ली सायबर क्राईम युनिट आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचा दावा करत फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराची स्काईपद्वारे चौकशी केली. शिवाय त्यांचे आधार तपशील वापरून एक बँक खाते उघडण्यात आल्याचे सांगितले.ज्यात सेक्स रॅकेट, अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंगचे पैसे जमा झाल्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले. तक्रारदाराला आठवडाभर डिजिटल अटकेत ठेवण्यात आले.

    तक्रारीत काय म्हटले होते?

    पीडित सीआयओने त्यांच्या तक्रारीत असे म्हटले आहे की, राहुल शुक्ला नावाच्या व्यक्तीचा २२ ऑगस्ट रोजी त्यांना फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ची कुरिअर कंपनी असल्याचे सांगितले. पत्ता न सापडल्याने तुमचं थायलंडला पाठवलेले पार्सल परत करण्यात आल्याचे शुक्लाने सांगितले. शुक्ला म्हणाले की पार्सलमध्ये पाच पासपोर्ट, तीन बँक क्रेडिट कार्ड, एक लॅपटॉप, ४.२ किलो कपडे आणि १४० ग्रॅम एमडीएमए औषधे आहेत. तक्रारदाराने हे पार्सल त्यांचे नसल्याचे सांगताच शुक्ला म्हणाला की, त्यात बेकायदेशीर वस्तू असल्याने त्याची तपासणी केली जाईल. शुक्लाने तक्रारदाराला दिल्ली सायबर पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आणि
    बनावट उपनिरीक्षक प्रदीप जैन या दुसऱ्या व्यक्तीशी कॉल जोडला. त्यानंतर जैन याने त्यांना स्काईप ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. तक्रारदाराने सूचनांचे पालन केले. तक्रारदाराने जैन याला “तुमचा कॅमेरा बंद का आहे?” असे विचारले असता, जैन याने सुरक्षेच्या कारणास्तव चेहरा दाखवता येत नसल्याचे सांगितले. यानंतर तक्रारदाराला सीबीआयमधील बनावट असिस्टंट एसपी आणि तपास अधिकारी समाधान पवार यांच्याशी बोलण्यास सांगण्यात आले.

    ६८ लाख रुपये तक्रारदाराच्या नावे खात्यात जमा केले

    एफआयआरनुसार, पवार याने तक्रारदाराला सांगितले की, त्यांच्या आधार कार्डच्या माहितीचा वापर करून एक बँक खाते उघडण्यात आले आणि त्यात ६८ दशलक्ष रुपये जमा करण्यात आले. ही रक्कम एका टोळीने देहविक्री, अंमली पदार्थांची तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगमधून मिळवून तक्रारदाराच्या नावावर खात्यात जमा केली.

    १.०७ कोटींचे हस्तांतरण

    “ही एक मोठी टोळी असून त्यात अनेक लोक सामील आहेत त्यामुळे गोपनीयता राखा. जर हा प्रकार कोणाला सांगितला तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो” असे समाधान पवार याने तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराला त्याच्या गुंतवणुकीबद्दल आणि बँक खात्याबद्दल विचारणा केली. व सर्व पैसे आरोपीने दिलेल्या बँक खात्यात पाठवण्याची सूचना केली. त्यानुसार तक्रारदाराने १.०७ कोटी रुपये ट्रान्सफर केले. आरोपींनी तपासानंतर ८-१०तासांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आरोपींनी ना पैसे परत केले ना तक्रारदाराच्या कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद दिला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तक्रारदाराने उत्तर विभाग सायबर क्राइम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली, ज्याचा तपास आता सुरू आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed